किसान क्रेडिट कार्डवर यावर्षी RBI किती कर्ज देणार? आता शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती आली समोर…

नवी दिल्ली : सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजना सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत शेतकरी आपली जमीन गहाण ठेवून अत्यंत कमी व्याजदरात शेतीसाठी कर्ज घेऊ शकतात. सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेल्या या कर्ज योजनेला किसान क्रेडिट कार्ड किंवा ग्रीन कार्ड म्हणतात.
ही योजना १९९८ मध्ये भारत सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नाबार्ड यांच्या सहकार्याने सुरू केली होती. या योजनेंतर्गत शेतकरी त्यांच्या जवळच्या बँकेत जाऊन, त्यांच्या जमिनीची कागदपत्रे जमा करून आणि कर्ज घेण्याची सामान्य कागदपत्रे पूर्ण करून कर्ज घेऊ शकतात.
तसेच किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत, सरकार शेतकऱ्यांना केवळ ४% व्याजदराने ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देते. मात्र, यासाठी काही अटी आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे.
दरम्यान, किसान क्रेडिट कार्ड योजनेची सुरुवात केंद्र सरकारने १९९८ मध्ये केली होती. भारतातील कोणताही शेतकरी याचा लाभ घेऊ शकतो. शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे हा या कर्ज योजनेचा उद्देश आहे. यामध्ये शेतकरी चार टक्के व्याजाने तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. यापेक्षा जास्त कर्ज शेतकऱ्यांनी घेतल्यास व्याजदर वाढतो.
किती व्याज शेतकऱ्यांना द्यावे लागेल?
किसान क्रेडिट कार्डवर एकूण ९% व्याजदर आहे. या योजनेत केंद्र सरकारकडून २% अनुदान दिले जाते. याशिवाय एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी कर्जाची परतफेड केल्यास शेतकऱ्यांना ३ टक्के प्रोत्साहनपर रक्कमही दिली जाते. अशा प्रकारे या कर्जावरील व्याजदर केवळ चार टक्केच राहतो. म्हणूनच याला देशातील सर्वात स्वस्त कर्ज म्हटले जाते, जे भारतातील शेतकऱ्यांना उपलब्ध आहे.
कर्ज किती मिळणार?
कृषी कर्जाबाबत आरबीआयने डिसेंबरमध्ये मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डवर विना तारण २ लाख रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. २०२५ पासून या कर्जाचा लाभ घेता येणार आहे. यामुळे देशभरातील लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.