जेजुरीत भीषण अपघात! ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; ज्ञानोबा माऊलींच्या पालखीसोबत जाताना दुर्दैवी घटना

जेजुरी : आषाढी एकादशीनिमित्त पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून वारकरी पायी वारी करत पंढरपूरच्या दिशेने जात आहेत. या भक्तिमय वातावरणात जेजुरी येथे सोमवारी सकाळी दुर्दैवी घटना घडली. वारकऱ्यांच्या दिंडीत सामान वाहून नेणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने भीषण अपघात झाला.

या अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून १५ ते १६ वारकरी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, जेजुरी परिसरातील भोंगळे मळा येथे हा अपघात झाला. ज्ञानोबा माऊलींच्या पालखीसोबत जाणारे काही वारकरी पुढील मुक्कामाच्या दिशेने पायी जात असताना मागून आलेल्या सामान वाहून नेणाऱ्या ट्रकने वारकऱ्यांच्या गर्दीत शिरत धडक दिली.

सासवडचा मुक्काम संपल्यानंतर आज पालखी जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ होणार होती. त्याआधी काही वारकरी पुढे निघाले होते. याच वेळी हा अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला असून वारकऱ्यांच्या किंकाळ्यांनी परिसर हादरून गेला.

दरम्यान, ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण कसे सुटले, तसेच वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून पुरेशी खबरदारी घेण्यात आली होती का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या दुर्घटनेमुळे वारकरी संप्रदायात आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.