भयंकर! १९ वर्षांच्या तरुणीवर २३ नराधमांकडून सलग सात दिवस अत्याचार, घटनेने देश हादरला…

उत्तर प्रदेश : महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी एक अत्यंत संतापजनक आणि क्रूर घटना उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून समोर आली आहे. येथे एका १९ वर्षीय तरुणीवर तब्बल २३ नराधमांनी सात दिवसांपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
तसेच पीडित तरुणी घरी परतल्यानंतर तिने आपल्या आईला आपबिती सांगितली, ज्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत ६ आरोपींना अटक केली आहे. या घटनेने देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित १९ वर्षीय तरुणी मागील महिन्यात घरातून निघून गेली होती. त्यानंतरच्या सात दिवसांच्या काळात तिला नरकयातना भोगाव्या लागल्या. वेगवेगळ्या व्यक्तींनी तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेले आणि तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले.
दरम्यान, एकूण २३ जणांनी हा अत्याचार केल्याचा आरोप आहे. इतकेच नाही, तर या अत्याचारादरम्यान आरोपींनी पीडितेला अमली पदार्थ देऊन तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतला आणि विकृतीचा कळस गाठला, असेही म्हटले जात आहे.
सात दिवसांच्या या भीषण अत्याचारांनंतर पीडित तरुणी कशीबशी घरी परतली. तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. आपल्या मुलीसोबत घडलेले हे अमानुष कृत्य ऐकून आईला मोठा धक्का बसला.
दरम्यान, मुलीने आपबिती सांगितल्यानंतर, तिच्या आईने रविवारी (ता.६) पोलीस ठाण्यात जाऊन लेखी तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ कारवाईला सुरुवात केली. पीडितेच्या जबाबाच्या आधारे एकूण २३ जणांविरोधात अत्याचारासह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.