Govinda : अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली गोळी, रुग्णालयात उपचार सुरू, नेमकं घडलं काय?

Govinda : हिंदी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवलेला अभिनेता गोविंदा उर्फ गोविंद अरुण आहुजा यांच्या पायाला मंगळवारी पहाटे बंदुकीची गोळी लागल्याची घटना घडली. या घटनेत गोविंदा हे जखमी झाले आहेत.
त्यांना तातडीने नजीकच्या क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करुन त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना समोर आल्यानंतर सुरुवातीला गोविंदा यांच्याकडे असलेल्या परवानाधारक पिस्तुलमधून चुकून गोळी सुटल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गोविंदा आज पहाटे पाचच्या सुमारास घरातून निघणार होते. तेव्हा घरात परवाना असलेली बंदूक ते साफ करत होते. त्यावेळी चुकून गोळी झाडली गेली आणि त्यांच्या पायाला लागली. Govinda
यानंतर त्यांना क्रिटी केअर रुग्णालयात दाखल केलं. त्याच्यावर उपचार केले जात आहेत. गोविंदाची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांना कोणताही धोका नसल्याचं क्रिटी केअर रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले आहे.