पुणेकरांची आनंदाची बातमी! पुणे रिंगरोडचे काम वेळेत होणार पूर्ण, एमएसआरडीसीचा मास्टर प्लान तयार, कामही सुरू…

पुणे : पुणे शहरात महत्वाचा असणारा ‘रिंगरोड’ प्रकल्प आता प्रत्यक्षात आकार घेत आहे. हा एक महत्वाचा प्रकल्प असून यामुळे मोठी वाहतूक कोंडी सुटणार आहे. या प्रकल्पामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील ताण कमी होऊन, वाहतूक अधिक सुरळीत आणि वेगवान होणार आहे. यामुळे या प्रकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ एमएसआरडीसीने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सखोल मास्टर प्लॅन तयार केला आहे. प्रकल्पाच्या एकूण खर्चाचा अंदाज सुमारे 42 हजार 711 कोटी रुपये इतका आहे. राज्य सरकारकडून यासाठी प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. हा रिंगरोड प्रकल्प एकूण 172 किलोमीटर लांबीचा आहे. यामुळे कामाला गती प्राप्त झाली आहे.
या रोडची रुंदी 110 मीटर आहे. रस्त्याचा विस्तार पुणे शहराच्या भोवती वर्तुळाकार स्वरूपात करण्यात येत आहे, ज्यामुळे शहराच्या आत येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात बाहेरच वळवता येईल. या रिंगरोडच्या कामात कोणतीही विलंब झाला तर निवड झालेल्या कंत्राटदार कंपन्यांना दिवसाला एक लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
या रस्त्याचे दोन मुख्य विभाग – पूर्व आणि पश्चिम – असे विभागले गेले आहेत. पूर्व भागात सात टप्पे आणि पश्चिम भागात पाच टप्पे याप्रमाणे कामांची आखणी झाली आहे. वेळेचे व्यवस्थापन अत्यंत व्यवस्थित केले जाणार आहे. या कामात उशीर केला जाणार नाही. प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी प्रशासनाकडून नियम लागू करण्यात आले असून समन्वय साधण्यात येत आहे.
अनेक किचकट वाटाघाटी, कायदेशीर अडथळे आणि तांत्रिक प्रक्रिया पार केल्यानंतर प्रकल्पाची प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. यासाठी नऊ कंपन्यांनी वाडेबोल्हाई, खडकवासला, सिंहगड, मुळशी, उर्से, चाकण, हिंजवडी, सोरतापवाडी या भागांमध्ये कामाला सुरुवात केली आहे. यामुळे लवकरच हा प्रकल्प मार्गी लागेल.
दरम्यान, या प्रकल्पामुळे औद्योगिक, आर्थिक आणि नागरी विकासाला चालना मिळेल. नवीन रस्ता उभारणीमुळे नव्या व्यवसायांची वाढ, औद्योगिक वसाहतींना प्रोत्साहन, रोजगाराच्या संधी शहरी नियोजन अधिक भक्कम होणार आहे. यामुळे हा प्रकल्प महत्वाचा आहे.