देशवासीयांसाठी सुवर्णक्षण! भारत आज चंद्रावर पाऊल ठेवणार, देशवासीयांकडून प्रार्थनांचे आयोजन…

नवी दिल्ली : गेल्या ४० दिवसांपासून प्रत्येक भारतीय ज्या ऐतिहासिक प्रसंगाची वाट पाहात आहे, ते चंद्रारोहण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. बुधवारी सायंकाळी निर्धारित वेळेनुसार सहा वाजून चार मिनिटांनी भारताचे ‘चांद्रयान’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारे पहिले यान भारताचे असणार आहे. तसेच चंद्रावर पोहोचणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे. १४ जुलै रोजी श्रीहरीकोटा येथून झेपावलेले चांद्रयान ४० दिवसांनी चंद्रावर उतरणार आहे.
बुधवारी सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी चांद्रयानाचे विक्रम लँडर चंद्रावर उतरणार असून, त्याच्या अर्धा तास आधी अंतिम टप्प्याला प्रारंभ होईल. बंगळूरच्या ‘इस्रो’च्या मिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्स अर्थात मुख्य नियंत्रण कक्षातून या सॉफ्ट लँडिंगची सारी सूत्रे हाताळली जाणार आहेत.
चांद्रयान-2 मोहिमेत राहिलेल्या त्रुटी दूर करून ही मोहीम आखण्यात आल्याने यावेळी कोेणत्याही परिस्थितीत चांद्रयान चंद्रावर उतरेल याची वैज्ञानिकांना खात्री आहे. इस्रोने मंगळवारी ट्विट करून चांद्रयान निर्धारित कार्यक्रमानुसार चंद्राभोवती प्रदक्षिणा मारत आहे.
त्याची सर्व यंत्रणा नियमित तपासली जात आहे. सारे मिशन निर्धारित वेळेनुसार सुरू आहे, असे म्हटले आहे. बंगळूरमधील मिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्स अर्थात मुख्य नियंत्रण कक्ष शेवटच्या टप्प्यासाठी उत्सुक आणि उत्साही असल्याचेही इस्रोने नमूद केले आहे.
दरम्यान, भारताची चंद्रयान मोहीम यशस्वी व्हावी या मोहिमेत भारताच्या शास्त्रज्ञाना यश मिळावे या साठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने मंदिरात आज पहाटे गणेशास अभिषेक करण्यात आला. यासाठी दूध दही विविध फळांचे रस सुकामेवा आदींचा वापर करण्यात आला.
आज संध्याकाळी भारताचे चांद्रयान चंद्रावर उतरणार आहे त्याचे लँडिंग सुरक्षित व्हावे यासाठी हा अभिषेक करण्यात आला. याशिवाय गणपती बाप्पांचा मुकुटावर चंद्रकोर लावून भालचंद्र शृंगार करत बाप्पाला सजवण्यात आले मोहीम यशस्वी व्हावी यासाठी गणपती बाप्पाला प्रार्थना करण्यात आली.