पुणे हादरलं! मित्रांच्या मदतीने पत्नीवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

पुणे : एका नराधम पतीने ५ मित्रांसह आपल्याच पत्नीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच याचे चित्रीकरण करून प्रसारित करण्याची धमकी सुद्धा पीडित तरुणीला दिली. ही घटना मार्केट यार्डजवळील परिसरात घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पतीसह त्याच्या ५ मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, पुणे येथील एका महिलेचा सन २०१६ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील एका इसमासोबत विवाह झाला होता. काही दिवसानंतर लग्नानंतर पतीने तिचा छळ सुरू केला. दररोजच्या भांडणाला कंटाळून पीडित महिला आपल्या माहेरी पुणे येथे आली. त्यानंतर सन २०२० मध्ये सदर महिलेचा पती आपल्या ५ मित्रांसह पुणे येथे तिला भेटण्यासाठी आला.

परंतु तिच्या माहेरी न जाता पतीने तिला फोन करून घराबाहेर येण्यास सांगितले. पीडिता घराबाहेर येताच आरोपी पतीने तिला निर्जनस्थळी घराजवळील झुडपामध्ये खेचत नेले, त्याठिकाणी आरोपीचे ५ मित्र हजरच होते. यावेळी पतीसह ५ नराधमांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी अत्याचाराचे मोबाईलवर चित्रिकरण सुद्धा केले.

तसेच, फिर्यादी महिला आरडाओरडा करत असताना या पाच जणांनी तिचे तोंड दाबून आणि हातपाय बांधून हे अमानुष कृत्य केले. तसेच याबाबत कुणाला सांगितल्यास पीडितेला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. या घटनेनंतर पीडिता प्रचंड घाबरली. तिने घडलेला प्रकार कुणालाही सांगितला नाही. आरोपींनी याच गोष्टीचा फायदा घेत सुमारे वर्षभर वारंवार बोलावून तिच्यावर गाडीमध्ये सामूहिक बलात्कार केला
दरम्यान, वेदना असह्य झाल्याने पीडितेने या संपूर्ण प्रकाराची माहिती आपल्या वडिलांना दिली. आपल्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे कळताच वडिलांनी पीडितेला घेऊन तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.