चार दशकांचा अभिनय प्रवास संपला! ‘3 इडियट्स’ फेम अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन, सिनेसृष्टीवर शोककळा..

मुंबई : मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. सोमवारी त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अखेर १९ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने मराठी व बॉलिवूड या दोन्ही चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. रिपोर्टनुसार, मागील काही दिवसांपासून अच्युत पोतदार हे आरोग्याच्या समस्यांमुळे त्रस्त होते आणि रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
अच्युत पोतदार हे केवळ अभिनेता नव्हते तर ते एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. भारतीय सैन्यात कॅप्टन पदावर सेवा करून त्यांनी देशसेवा बजावली. त्यानंतर इंडियन ऑइल कंपनीत त्यांनी कारकीर्द घडवली. मात्र, अभिनयाची आवड त्यांना चित्रपटसृष्टीत खेचून आणली.

१९८० च्या दशकात त्यांनी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पुढील चार दशकांत त्यांनी १२५ हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली.

बॉलिवूड दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या ‘3 इडियट्स’ या गाजलेल्या चित्रपटात अच्युत पोतदार यांनी प्राध्यापकाची भूमिका साकारली होती. “कहना क्या चाहते हो?” आणि “क्या बात है” हे त्यांचे संवाद आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यांच्या सहजसुंदर अभिनयामुळे हा छोटा परंतु लक्षवेधी रोल आजही अजरामर ठरला आहे.
पोतदार यांनी ‘आक्रोश’, ‘अर्धसत्य’, ‘तेजाब’, ‘परिंदा’, ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘दिलवाले’, ‘रंगीला’, ‘वास्तव’, ‘दबंग 2’, ‘व्हेंटिलेटर’ यांसारख्या गाजलेल्या हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्यांच्या अभिनयातील वास्तववाद, साधेपणा आणि भावपूर्णता यामुळे त्यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम लाभले.
चित्रपटांसोबतच अच्युत पोतदार यांनी दूरदर्शन आणि मालिकांमध्येसुद्धा आपली छाप सोडली. ‘वागले की दुनिया’, ‘माझा होशील ना’, ‘मिसेस तेंडुलकर’, ‘भारत की खोज’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी प्रभावी कामगिरी केली. त्यांच्या अभिनयामुळे ते घराघरात पोहोचले आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले.
अच्युत पोतदार यांचे पार्थिव १९ ऑगस्ट रोजी ठाण्यात अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा सुवर्णअध्याय संपुष्टात आला आहे. पोतदार यांचे जीवनप्रवास भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील.