अखेर पुरंदर विमानतळाला हिरवा कंदील, औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना जारी, आता कामाला मिळणार गती…

पुणे : गेल्या काही वर्षांपासून पुरंदर विमानतळाचा प्रश्न प्रलंबित आहे. राज्याच्या अर्थसंकल्पातही पुरंदर विमानतळासाठी कोणतीही तरतूद न केल्याने नाराजी पसरली होती. हे विमानतळ होणार की नाही यावरून अनेकदा चर्चा झाली असली तरी आता हा प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत एक मोठा निर्णय झाला आहे.
उद्योग विभागाने विमानतळासाठी यापूर्वीच निश्चित केलेल्या सात गावांमधील दोन हजार ८३२ हेक्टर जागा औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे पुरंदर विमानतळाचा मार्ग आता मार्गी लागणार आहे. यामुळे आता पुढील कामाला गती मिळणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमानुसार हे क्षेत्र निश्चित केले गेले आहे.
उद्योग विभागाचे सहसचिव डॉ. श्री. ल. पुलकुंडवार यांनी ही अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे पुरंदर विमानतळाचे भूसंपादन याच कायद्यानुसार पुढे होण्याची शक्यता वर्तवली आहे. पुरंदर तालुक्यातील वनपुरी, पारगाव मेमाणे, कुंभारवळण, एखतपूर, उदाची वाडी, मुंजवडी, खानवडी या गावातील जमिनीचे ‘सर्व्हे क्रमांक’ व त्याचे क्षेत्रफळासह संपूर्ण तपशील औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे.
दरम्यान, आता उद्योग विभागाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार रस्ते, पाणंद, ओढा यांच्यासाठीच्या काही जागा संपादित केल्या जाणार आहेत. या सर्व सात गावांमधील चतुःसीमाही निश्चित करण्यात आल्या आहेत. त्या लाल रंगाच्या रेषेने दाखविण्यात आल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.
पुरंदर विमानतळासाठी एकूण दोन हजार ८३२ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. विमानतळासाठी ऑक्टोबर २०१६मध्ये घोषणा झाली होती. पुरंदर तालुक्यातील याच सात गावांमधून भूसंपादन करण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु, सुरुवातीपासून त्याला विरोध झाला.