शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचं संकट; गारपिटीचा इशारा, आज ‘या’ जिल्हयांना अलर्ट जारी…

पुणे : राज्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. हा अवकाळी पाऊस उद्यापर्यंत म्हणजेच ४ एप्रिलपर्यंत राहणार आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागामध्ये वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट जास्त असून, या भागात काही ठिकाणी ‘गारपीट’ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आजपासून ६ एप्रिलपर्यंत विजांचा कडकडाटासह वादळी वारे आणि गारपिट, तर काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होईल, असा इशारा देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही भागामध्ये वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट जास्त असून, या भागात काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात काही भागांत ‘यलो आणि ऑरेंज’ अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा केळी, द्राक्ष, कांदा पपई, गहू, मका, आदी पिकांना फटका बसला आहे.
दरम्यान, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, नाशिक घाट, सातारा, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या भागात येलो अलर्ट देण्यात आला आहे.
तर अहिल्यानगर, पुणे घाट, कोल्हापूर घाट, चंद्रपूर या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अकोला, अमरावती, चंद्रपूर या तीन जिल्ह्यात गारपिटीचं संकट आहे.
दरम्यान, पुण्यात ३ एप्रिल रोजी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस आणि किमान २० अंश सेल्सिअस असेल .तर दुपारच्या वेळी गारपीट आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे.