प्रसिद्ध अभिनेते विलास उजवणे यांचं निधन, ६२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

मुंबई : आपल्या अभिनयाची छाप सोडणारे प्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 62 व्या वर्षी उजवणे यांनी जगाचा निरोप घेतला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. चार दिवस सासूचे, दामिनी आणि वादळवाट सारख्या टीव्ही मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
त्यांनी मराठीच नव्हे तर हिंदी सिनेमातही आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. त्यांच्या नैसर्गिक अभिनयामुळे ते घराघरामध्ये पोहोचले होते. प्रेक्षकांनी त्यांना नकारात्मक भूमिकांमंध्येही स्वीकारले होते. अनेक ठिकाणी त्यांनी काम केलं होतं. मात्र ते सतत आजारी पडत होते.
कालच मनोज कुमार यांच्या नंतर विलास उजवणे यांचंही निधन झाल्याने सिनेक्षेत्राला मोठा झटका बसला आहे. यातच आज अजून एक निधनाची बातमी समोर आली आहे. विलास उजवणे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना काही वर्षांपूर्वी ब्रेन स्ट्रोकही आला होता. यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती.
त्याचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला होता. त्यांना हृदयविकाराचाही त्रास होत होता. गंभीर आजारामुळे उपचाराचा खर्च वाढत असल्याने त्यांना आर्थिक अडचणीचाही सामना करावा लागला होता. त्यांच्या मित्र परिवाराकडून आर्थिक मदतीचे आवाहनही करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरूच होते.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मीरा रोड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले आहे. आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.