सुप्रिया सुळे मुख्यमंत्री झाल्यास शपथविधी सोहळ्यास जाणार!! संजय राऊत यांच्या वक्तव्याने सगळीच गणित जुळून येणार?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे राजकीय वर्तुळात याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. एनडीएत सामील होण्याच्या बदल्यात शरद पवार हे मुख्यमंत्रीपद मागणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
असे असताना मात्र सुप्रिया सुळे यांनी या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. सुप्रिया सुळे महायुतीच्या मुख्यमंत्री झाल्यास मी त्यांच्या शपथविधी सोहळ्याला जाईल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यामुळे राजकारणात नेमकं काय सुरू आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

राऊत यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. राऊत म्हणाले,
खासदार सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्रीपद मिळत असेल तर महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळेल. केवळ 10 आमदार असलेल्या पक्षाला भाजप मुख्यमंत्रीपद देऊ शकतं. इतकी दिलदारी भाजपकडे आहे, असा रेकॉर्ड सेट होईल. असा टोला त्यांनी लगावला.

तसेच त्यांना मुख्यमंत्री होऊ द्या ना. त्यांनी शपथ घेतल्यावर आम्ही बोलू, असे मिश्किल विधान संजय राऊत यांनी केले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत विचारण्यात आले. त्यावर संजय राऊत यांनी मिश्किल उत्तर दिले.

दरम्यान, पाठिंबा सुप्रिया सुळेंना देणार का? असा सवाल संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यासाठी आम्हाला उद्धव ठाकरेंशी चर्चा करावी लागेल. उद्धव ठाकरेच निर्णय घेतील. मला व्यक्तिगत विचाराल तर सुप्रिया सुळे खरोखर मुख्यमंत्री होत असतील तर त्यांचे स्वागत केले पाहिजे, असेही ते म्हणाले.
