पुरंदर विमानतळाच्या मोजणीसाठी ९ एप्रिलपासून ड्रोन सर्व्हेक्षण होणार जागेच्या भूसंपादनासाठी ‘एमआयडीसी’कडून वाढ जिल्हा प्रशासनाला सूचना…


पुणे : पुरंदर येथील छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रस्तावित जागेच्या भूसंपादनाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करुन विमानतळाचे काम सुरु करावे, अशा सूचना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू यांनी केल्या आहेत.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पुरंदर विमानतळाच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी तसेच जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, बारामती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी, पुरंदरचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपअधीक्षक भूमी अभिलेख,महापारेषण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पी. वेलरासू म्हणाले, पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी २८३२ हे.आर. क्षेत्राचे भूसंपादन करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ मधील तरतुदीनुसार शासनाने मान्यता दिली आहे. मोजणीसाठी लागणारे शुल्क ४.८० कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. भूसंपादन प्रक्रियेत येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

भूसंपादन प्रक्रियेचे तात्काळ नियोजन करुन अचूक व पारदर्शकपणे प्रक्रिया पूर्ण करावी, नियोजित क्षेत्रासाठी प्रस्तावित केलेल्या गावांतील ७/१२ अद्ययावत असल्याची तसेच मोजणीमध्ये असलेल्या वस्तुस्थितीनुसार ७/१२ असल्याची, त्या गावांतील पीक पाहणी झाली असल्याची खात्री करा, ड्रोन सर्व्हेक्षण करा, जिल्हाधिकारी यांच्या नियोजित गावांमध्ये बैठका झाल्यानंतर नोटीस पाठवून मोजणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.

९ एप्रिल पासून ड्रोन सर्व्हेक्षणाला सुरुवात करावी, मोजणीपूर्वी गावकऱ्यांना पूर्वकल्पना द्यावी, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.

बैठकीत अधिसूचना प्रसिद्धी, ड्रोन सर्वेक्षण, मोजणी शुल्क, शासकीय जमीन वर्ग करणे, चर्चेने दर ठरविणे व निवाडा, चर्चा फिस्कटल्यास सक्तीचे भूसंपादन व निवाडा करणे, सरकारी क्षेत्र व वनक्षेत्र महामंडळास हस्तांतरीत करणे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, भूमी अभिलेख व पोलीस विभाग यांनी मौजे वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एखतपुर, मुंजवडी, खानवडी व पारगाव या ७ गावांतील संयुक्त मोजणी पूर्ण करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!