दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मोठा निर्णय! आता कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही…

पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये आता कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही. रुग्णालय प्रशासनाने याबाबत आज घोषणा केली आहे. यामुळे अनेक रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती मृत्यू प्रकरणी सध्या वातावरण तापले असून कारवाईची मागणी केली जात आहे.
काल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीनं उपचार न मिळाल्यानं तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत कारवाईची मागणी केली जात आहे. याबाबत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी एक पोस्ट करत कारवाईचे आश्वासन दिले होते.
याबाबत ते म्हणाले, या भगिनीचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल शासनानं घेतली आहे. आरोग्य विभागानं तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग असलेल्या समितीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना ही चौकशी तातडीनं, पारदर्शक आणि निष्पक्षपणे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
रुग्णालय प्रशासनानं त्यांचं म्हणणं मांडलं असलं तरी, संबंधित सर्व घटकांचा विचार करून योग्य ती कारवाई केली जाईल. या प्रकरणी आंदोलन करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांच्या भावना शासनानं समजून घेतल्या असून चौकशीच्या निष्कर्षानुसार दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.
सर्व नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनाला सहकार्य करावं, ही विनंती. असे अजित पवार यांनी म्हटले आहे. यामुळे आता चौकशी करून कारवाई होणार आहे. या प्रकरणी आज या रुग्णालयात आंदोलन करण्यात आले. यामुळे वातावरण तापले होते.
पुण्यात ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले. तसेच येथील अधिकाऱ्यांवर चिल्लर फेकण्यात आली. याबाबत रुग्णालयाकडून देखील अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये सुरुवातीपासूनची सगळी माहिती देण्यात आली आहे. आता काही बदल करण्यासाठी प्रशासनाकडून बैठका सुरू आहेत.