‘त्या’ एका शब्दामुळे शरद पवारांची साथ सोडली; दिलीप वळसे पाटलांचा मोठा खुलासा, आता महायुतीला इशारा


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अनेक नेत्यांनी अजित पवारांच्या गटात जाण्यामागे विकासकामांचे कारण दिले होते. मात्र, शरद पवारांचे एकेकाळचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपण शरद पवारांची साथ का सोडली, यामागचे कारण स्पष्ट केले आहे. डिंभे धरणातून प्रस्तावित असलेला बोगदा रद्द करण्यासाठी दिलेला शब्द हेच पक्षबदलामागचे प्रमुख कारण असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत या विषयावर आपली भूमिका मांडली. “डिंभे धरणातून निघणारा बोगदा रद्द करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता. केवळ त्या एका शब्दासाठी मी साहेबांची साथ सोडली,” असे त्यांनी म्हटले आहे.

डिंभे ते माणिकडोह असा सुमारे १६ किलोमीटर लांबीचा प्रस्तावित बोगदा हा आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि पारनेर परिसरातील शेतकऱ्यांसाठी संवेदनशील मुद्दा बनला आहे. या प्रकल्पामुळे शेतीसाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

वळसे पाटील यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीच्या काळात देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि आपण अशी बैठक झाली होती. या बैठकीत संबंधित बोगदा कोणत्याही परिस्थितीत होऊ दिला जाणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचा दावा त्यांनी केला. शेतकऱ्यांचे पाणी वाचावे आणि बोगदा रद्द व्हावा, यासाठीच आपण शरद पवारांपासून दूर जाऊन अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, आता या प्रकल्पाच्या मुद्द्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. बोगद्याबाबत मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले. वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो, त्यानंतर पुढील भूमिका निश्चित केली जाईल, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.

दरम्यान, दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांचे अनेक दशकांपासूनचे जवळचे संबंध आहेत. वळसे पाटील यांच्या राजकीय वाटचालीत शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी त्यांनी शरद पवारांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही काम केले होते. पुढे पवारांनी त्यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिले आणि त्यानंतर ते आमदार तसेच मंत्री झाले.

अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर दिलीप वळसे पाटील हे पवारांसोबतच राहतील, असा अंदाज अनेकांकडून व्यक्त करण्यात येत होता. मात्र, त्यांनी अजित पवारांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली. आता डिंभे-माणिकडोह बोगद्याच्या मुद्द्यावर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या राजकीय भूमिकेची चर्चा रंगली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!