चारित्र्यावर संशय, पुण्यात पत्नीची हत्या; पती कर्नाटकात जाऊन शेतात लपला, पण ‘या’ चुकीमुळे 24 तासांत पोलिसांच्या हाती

पुणे : भूगाव येथील तोडकर वस्ती परिसरात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्येनंतर आरोपी पती घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र, बावधन पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या 24 तासांत आरोपीला कर्नाटकातून अटक केली.
परशुराम भागप्पा हरिजन (वय 48) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, नीलाबाई हरिजन (वय 42) असे मृत महिलेचे नाव आहे.

भूगावमधील तोडकर वस्ती परिसरात हे दाम्पत्य राहत होते. गेल्या काही दिवसांपासून परशुराम हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याची माहिती समोर आली आहे. याच संशयातून त्याने पत्नीवर हल्ला केला. या घटनेत नीलाबाई यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.


घटनेची माहिती मिळताच बावधन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी फरार असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
मोबाईल लोकेशनमुळे आरोपीचा माग काढला
पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल लोकेशनचे विश्लेषण करत त्याच्या हालचालींचा माग काढला. तपासादरम्यान आरोपी महाराष्ट्राची सीमा ओलांडून कर्नाटकातील विजापूर परिसरात गेल्याचे समोर आले. तो तेथील एका शेतात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
लोकेशन निश्चित झाल्यानंतर बावधन पोलिसांचे विशेष पथक तातडीने कर्नाटकच्या दिशेने रवाना झाले. स्थानिक पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने परिसरात शोधमोहीम राबवून आरोपीला मध्यरात्री ताब्यात घेण्यात आले.
हत्येनंतर अवघ्या 24 तासांत आरोपीला परराज्यातून अटक करण्यात बावधन पोलिसांना यश आले आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बावधन पोलिसांच्या पथकाने केली.