प्रेमविवाहाचा राग अनावर! पिंपरी-चिंचवडमध्ये तरुणावर पिस्तूल अन् कोयत्याने जीवघेणा हल्ला; थरारक प्रकाराने खळबळ


पिंपरी-चिंचवड : प्रेमविवाहाला विरोध असतानाही लग्न केल्याचा राग मनात धरून पत्नीच्या भावांनी तरुणावर पिस्तूल आणि कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना पिंपळे निलख येथे मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. हल्ल्यावेळी पिस्तूल हातातून खाली पडल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, तरुणाला वाचवण्यासाठी धावलेल्या त्याच्या दोन भावांवरही हल्ला करण्यात आल्याने तिघे जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि जखमी तरुण हे एकमेकांचे मित्र असून ते एका व्यवसायात भागीदारही होते. आरोपींचे आणि तरुणाचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे असल्याने तरुणाचे आरोपींच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. पुढे दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या विवाहाला आरोपींच्या कुटुंबीयांचा विरोध होता.

कुटुंबीयांची नाराजी असतानाही तरुणाने सुमारे चार महिन्यांपूर्वी आरोपींच्या बहिणीसोबत प्रेमविवाह केला. हा विवाह आरोपींना मान्य नव्हता. याच कारणातून त्यांच्या मनात तरुणाविषयी राग होता.

मंगळवारी दुपारी तरुण कामानिमित्त घराबाहेर पडला. याच वेळी घराजवळ आरोपींनी त्याला गाठले आणि पिस्तूल तसेच कोयत्याने हल्ला केला. हल्ल्यादरम्यान आरोपींच्या हातातून पिस्तूल खाली पडले. त्यामुळे तरुणाला मोठी दुखापत होण्यापासून बचाव झाला. मात्र, त्याच्यावर झालेल्या हल्ल्यात तो जखमी झाला.

दरम्यान, भावावर हल्ला होत असल्याचे पाहून त्याचे दोन भाऊ त्याला वाचवण्यासाठी धावून आले. आरोपींनी त्यांच्यावरही हल्ला केल्याने ते दोघेही जखमी झाले. या घटनेत जखमी झालेल्या तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींकडून हल्ल्यासाठी वापरलेले पिस्तूल आणि कोयता जप्त केला आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. प्रेमविवाहाच्या वादातून घडलेल्या या हल्ल्यामागील संपूर्ण कारणाचा सांगवी पोलीस तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!