पुण्यात गणेशोत्सवासाठी मोठा निर्णय! 5 दिवस दारूविक्री बंद; ‘या’ 3 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 10 दिवस बंदी


पुणे : आगामी गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवातील प्रमुख दिवसांसह विसर्जन मिरवणुकीच्या मार्गांवरील मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिले आहेत.

विशेष म्हणजे, पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील खडक, विश्रामबाग आणि फरासखाना या तीन पोलीस ठाण्यांच्या संपूर्ण हद्दीत गणेशोत्सवाचे सर्व 10 दिवस मद्यविक्रीवर बंदी असणार आहे. हा परिसर ‘ड्राय झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश

गणेशोत्सवाच्या काळात पुण्याच्या मध्यवर्ती भागात आणि विसर्जन मिरवणुकीच्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 मधील कलम 142 (1) नुसार मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार एफएल-2, एफएल-3, सीएल-3, एफएलबीआर-2, फॉर्म ई, फॉर्म ई-2 आणि टी.डी.-1 या प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्त्यांअंतर्गत येणारी दुकाने, बार आणि परमिट रूम संबंधित दिवस आणि परिसरात बंद राहणार आहेत.

तसेच, पुणे जिल्ह्यात ज्या ठिकाणी सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणुका निघतील, त्या सर्व मिरवणूक मार्गांवरील मद्यविक्रीची दुकानेही बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

‘या’ दिवशी पुण्यात मद्यविक्री बंद

14 सप्टेंबर – गणेश चतुर्थी : गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी संपूर्ण पुणे शहरात मद्यविक्री बंद राहणार आहे.

25 सप्टेंबर – अनंत चतुर्दशी : मुख्य विसर्जनाच्या दिवशी संपूर्ण शहरात दिवसभर मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार आहे.

26 सप्टेंबर : अनंत चतुर्दशीनंतर होणाऱ्या विसर्जन मिरवणुका पूर्ण होईपर्यंत मद्यविक्रीची दुकाने बंद राहतील.

याशिवाय गणेशोत्सवाच्या पाचव्या आणि सातव्या दिवशी ज्या भागांत विसर्जन मिरवणुका होणार आहेत, त्या मार्गांवरील मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 10 दिवस ड्राय झोन

खडक, विश्रामबाग आणि फरासखाना या तीन पोलीस ठाण्यांच्या संपूर्ण हद्दीत गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत मद्यविक्रीवर पूर्णपणे बंदी असणार आहे. त्यामुळे या भागातील मद्यविक्रीची दुकाने, बार आणि परमिट रूम्स संपूर्ण उत्सवकाळात बंद राहतील.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने संबंधित दुकानदार आणि अनुज्ञप्तीधारकांना आदेशाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!