लाडक्या बहिणींना गौरी-गणपतीचं गिफ्ट! ऑगस्टचा 1500 रुपयांचा हप्ता ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार?

मुंबई : राज्यातील लाखो महिलांचे लक्ष लागलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ऑगस्टचा 1500 रुपयांचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात नेमका कधी जमा होणार, याबाबत आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत विविध विकासकामांसोबतच लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणे आणि ऑगस्टच्या हप्त्याच्या वितरणाची तारीख निश्चित करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

गौरी-गणपतीच्या सणात मिळणार हप्ता?
शासकीय नियमानुसार दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत योजनेचा सन्माननिधी पात्र महिलांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित आहे. मात्र, ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही.


मिळालेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्याच धर्तीवर ऑगस्ट महिन्याचा हप्ता गौरी-गणपतीच्या सणादरम्यान वितरित करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
16 सप्टेंबरनंतर पैसे जमा होणार?
सूत्रांच्या माहितीनुसार, 16 सप्टेंबरनंतर ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये पात्र महिलांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने जमा करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते.
या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 1 कोटी 66 लाख पात्र महिलांना लाभ मिळतो. त्यामुळे सणासुदीच्या काळात हप्ता जमा झाल्यास महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळणार?
दरम्यान, तांत्रिक किंवा प्रशासकीय कारणांमुळे ऑगस्टचा हप्ता 20 सप्टेंबरपर्यंत जमा झाला नाही, तर ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास पात्र महिलांच्या खात्यात एकाच वेळी 3000 रुपये जमा होऊ शकतात.
मात्र, हप्त्याची निश्चित तारीख आणि दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र देण्याबाबतचा अंतिम निर्णय सरकारकडून अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.