मुंबई लोकलला ‘ब्रेक’ लावणारी आग नेमकी कुठे लागली? ५ तासांपासून प्रवासी रखडले, रात्रीपर्यंत हाल संपण्याची शक्यता कमी!


मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेवरील लोकल प्रवाशांचा प्रवास मोठ्या संकटात सापडला. सकाळपासून सुरू झालेल्या तांत्रिक अडचणींनी दुपारपर्यंत गंभीर रूप घेतले. मुलुंड-ठाणे दरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्यानंतर कांजूरमार्ग येथील सिग्नल यंत्रणेच्या केबिनमध्ये आग लागली. यामुळे ठाणे ते विक्रोळी दरम्यानची सिग्नल यंत्रणा ठप्प झाली आणि लोकल वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडले. दुपारी दोन वाजेपर्यंतही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलेली नव्हती.

आधी वायरमध्ये बिघाड, नंतर सिग्नल केबिनला आग

सोमवारी सकाळी सुमारे १० वाजता मुलुंड ते ठाणे दरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. त्यानंतर कांजूरमार्ग परिसरातील सिग्नल केबिनला आग लागल्याने संकट अधिकच वाढले. ठाणे ते विक्रोळी दरम्यानचे सिग्नल बंद पडल्यामुळे मोटरमनना गाड्या जागेवर थांबवाव्या लागल्या. परिणामी मध्य रेल्वेच्या अप आणि डाउन दिशेतील धीम्या व जलद मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली.

लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांनाही फटका

गाड्या एकामागोमाग एक रुळांवर उभ्या राहिल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या खोळंब्याचा परिणाम लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांवरही झाल्याचे वृत्त आहे. बराच वेळ गाड्या जागेवरच थांबल्याने काही प्रवासी खाली उतरून रुळांवरून जवळचे स्थानक गाठताना दिसले. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला.

दुरुस्तीसाठी आणखी तीन ते चार तास?

कांजूरमार्ग येथील सिग्नल यंत्रणेच्या केबल बदलण्याचे काम करावे लागणार असून, त्यासाठी आणखी तीन ते चार तास लागू शकतात, अशी माहिती वृत्तात देण्यात आली. मात्र, दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरही लोकलचे वेळापत्रक तातडीने पूर्ववत होईलच असे नाही. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास रात्रीपर्यंत वेळ लागू शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

संध्याकाळच्या गर्दीचं काय?

सकाळपासून रखडलेल्या लोकलमुळे संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची चिंता व्यक्त होत आहे. रविवारीच मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी झालेल्या या तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेच्या नियोजनावर प्रवाशांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. वारंवार होणारे विलंब आणि तांत्रिक अडचणी यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी वाढली आहे.

कांजूरमार्ग येथील सिग्नल यंत्रणा कधी पूर्ववत होणार आणि लोकलचे वेळापत्रक कधी सुरळीत होणार, याकडे आता प्रवाशांचे लक्ष लागले आहे. प्रवासाला निघण्यापूर्वी मध्य रेल्वेच्या अधिकृत सूचना तपासण्याचे आवाहन प्रवाशांसाठी महत्त्वाचे ठरते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!