धक्कादायक! नवरा-बायकोच्या भांडणाने कहर केला, 9 महिन्यांच्या बाळाला थेट स्कायवॉकवरुन फेकलं…

मुंबई : पत्नीशी झालेल्या वादानंतर एका पित्याने आपल्या अवघ्या नऊ महिन्यांच्या बाळाला स्कायवॉकवरून खाली फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

या प्रकरणातील तक्रारदार महिलेचं नाव आरती जाफर शेख (वय 22) असं आहे. रविवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत बाळ गंभीर जखमी झालं असून, त्याच्यावर शीव रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आरती आपल्या नऊ महिन्यांच्या बाळासह घाटकोपर पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील स्कायवॉकवर उभी होती.
ती घाटकोपरमधील सर्वोदय नगर परिसरात राहते. सुमारे दोन वर्षांपूर्वी तिचा जाफर शेख (वय 23) याच्याशी विवाह झाला होता. या दाम्पत्याला आरव नावाचा नऊ महिन्यांचा मुलगा आहे. आरोपी जाफरचा परिसरात कपडे विक्रीचा व्यवसाय असल्याची माहिती आहे. आरोपीला नशा करण्याचं व्यसन असल्याने त्यांच्यात रोज भांडण होत असल्याची माहिती आहे.


पती-पत्नीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वारंवार वाद होत होते. रविवारीदेखील दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता. त्यानंतर ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. घटनास्थळी त्याने पुन्हा एकदा पत्नीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. वाद सुरू असतानाच जाफर बाळाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, आरतीने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला.
यामुळे संतापलेल्या जाफरने कथितपणे आपल्या नऊ महिन्यांच्या मुलाला स्कायवॉकवरून खाली फेकून दिलं. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. याबाबत पोलीस तपास सुरु आहे.
