धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ, मामींनी केला गंभीर आरोप, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, नेमकं प्रकरण काय?

बीड : बीडच्या संतोष देशमुख हत्याप्रकरणी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांची मंत्रिपदावरुन हाकलपट्टी करण्यात यावी या मागणीने जोर धरला आहे. यामुळे आता ते राजीनामा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशातच आता धनंजय मुंडे यांच्या मामी सारंगी प्रवीण महाजन यांनी धनंजय मुंडे यांनी त्यांची परळीमधील जिरेवाडी येथील जमीन बळकावल्याचा आरोप केला आहे. बुधवारी धनंजय मुंडे यांच्या मामी सारंगी प्रवीण महाजन यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली.
खंडणी आणि खून प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्याच पण मलाही न्याय मिळवून द्या, असे आर्जव सारंगी महाजन यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केले.
धनंजय मुंडे यांनी माझी परळीमधील जमीन हडपली. धनंजय मुंडे हा माझा भाचा आहे. त्याने मला गोड बोलून परळीला बोलावलं आणि माझ्याकडून जमिनीच्या कागदोपत्री सह्या घेतल्या. साडे ३ कोटींची जमीन ही फक्त २१ लाखांना माझ्याकडून घेतली गेली.
दरम्यान, या सगळ्याला पंकजा मुंडे यांचीही मूकसंमती होती. त्या ही धुतल्या तांदळाच्या नाहीत. धनंजय मुंडे यांचा राजीनामा तर घ्यावाच पण आमदारकीही काढून घ्यावी, अशी विनंती सारंगी महाजन यांनी फडणवीस यांच्याकडे केली आहे.