देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचा शब्द पाळला! सरपंच संतोष देशमुख खूनप्रकरणातील ७ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई; वाल्मिक कराड अद्याप आरोपी नाही..

बीड : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने सर्व राज्य ढवळून निघाले आहे. या संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे.
वाल्मिक कराड हा अटकेत असून अन्य आरोपीही अटकेत आहे. सुदर्शन घुले,प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे आणि जयराम चाटे या सर्व आरोपीवर मोक्का लावण्यात आला आहे.
बीड पोलिसांनी सात आरोपींवर मोक्का लावलाय. वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावण्यात आला नाही. वाल्मिक कराड याला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेय. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती. ९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती.
त्यानंतर महिनाभरानंतरही आरोपींवर कारवाई न केल्यामुळे जनआक्रोश मोर्चे निघाले. बीड, धाराशिव, परभणी, पुणे आणि वाशिमसह राज्यभरात निदर्शने करण्यात आली होती. प्रशासनाकडून आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात येत होते. आज सात आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे.
एसआयटीने हा मोक्का लावला असून त्यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड हा मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप होतो आहे. पण वाल्मिक कराडला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याला अटक झालेली नाही.
म्हणून वाल्मिक कराडला मोक्का लावलेला नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने एसआयटी आणि सीआयडीकडे दिला आहे. संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा, यासाठी राज्यभरात मोर्चे निघत आहेत. सध्या राज्यात बीडमधील या हत्याकांडावरुन राजकारण तापलं आहे.
मोक्का हा कठोर कायदा आहे. संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी हा कायदा बनवण्यात आला आहे. आरोपीवर एकदा का मोक्का लागला की त्याला सहज जामिन मिळत नाही, म्हणजे तुरुंगातून बाहेर पडता येत नाही. विशेष म्हणजे मोक्का लागलेल्या आरोपींचा खटला विशेष न्यायालयात चालवला जातो.