उंदरांच्या विष्ठेत लपला आहे ‘मृत्यूचा व्हायरस’? हंटाव्हायरस फुफ्फुसांवर करतो थेट हल्ला, मृत्यूदर ५०% पर्यंत

मुंबई : घरात दिसणारा साधा उंदीरही जीवावर बेतू शकतो, असं सांगितलं तर? सध्या ‘हंटाव्हायरस’ नावाच्या धोकादायक विषाणूची जगभरात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. उंदरांच्या लघवी, लाळ आणि विष्ठेमधून पसरणारा हा व्हायरस थेट फुफ्फुसांवर हल्ला करतो आणि काही तासांतच रुग्णाची प्रकृती गंभीर बनवू शकतो. डॉक्टरांच्या मते, या आजारात मृत्यूदर तब्बल ३० ते ५० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो.

हंटाव्हायरसमुळे होणाऱ्या गंभीर आजाराला ‘हंटाव्हायरस कार्डिओ-पल्मोनरी सिंड्रोम’ (HCPS) असे म्हटले जाते. हा विषाणू शरीरात प्रवेश केल्यानंतर फुफ्फुसांतील रक्तवाहिन्यांवर परिणाम करतो. त्यामुळे रक्तवाहिन्यांमधील द्रव फुफ्फुसांमध्ये झिरपू लागते आणि फुफ्फुसात पाणी साचते. परिणामी शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि रुग्णाला अचानक श्वास घेण्यास त्रास, रक्तदाब कमी होणे तसेच शॉक येण्याची शक्यता निर्माण होते.
या आजाराची सुरुवातीची लक्षणे सामान्य फ्लूसारखी असल्याने सुरुवातीला तो ओळखणे कठीण ठरते. ताप, अंगदुखी, डोकेदुखी, थकवा, उलट्या आणि पोटदुखी अशी सामान्य लक्षणे दिसून येतात. मात्र काही दिवसांतच रुग्णाला गंभीर श्वसनाचा त्रास सुरू होऊ शकतो.

तज्ज्ञांच्या मते, हा विषाणू प्रामुख्याने संक्रमित उंदरांच्या लघवी, लाळ किंवा विष्ठेतील सूक्ष्म कण हवेत मिसळल्यानंतर श्वासावाटे शरीरात प्रवेश करतो. विशेषतः बंद, धुळकट आणि उंदरांची वस्ती असलेल्या ठिकाणी संसर्गाचा धोका अधिक असतो. उंदरांची कोरडी विष्ठा साफ करताना किंवा झाडलोट करताना हे कण हवेत उडतात आणि संसर्गाची शक्यता वाढते.

या आजारावर सध्या कोणतीही ठोस लस किंवा औषध उपलब्ध नाही. त्यामुळे उपचारादरम्यान रुग्णाचा ऑक्सिजन, श्वासोच्छ्वास आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यावर डॉक्टरांचा भर असतो. गंभीर रुग्णांना ICU आणि व्हेंटिलेटरची गरज भासू शकते.
तज्ज्ञांनी नागरिकांना घर, गोदामे आणि बंद जागा स्वच्छ ठेवण्याचा सल्ला दिला आहे. उंदरांची वस्ती होऊ न देणे, अन्नपदार्थ झाकून ठेवणे तसेच उंदरांची विष्ठा साफ करताना मास्क आणि हातमोजे वापरणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.
डॉ. प्रणय साई चंद्रगिरी, सल्लागार इंटरव्हेंशनल पल्मोनोलॉजिस्ट, यशोदा हॉस्पिटल्स, हैदराबाद यांच्या मते, हा आजार दुर्मिळ असला तरी अत्यंत गंभीर आहे. उंदरांच्या संपर्कानंतर ताप किंवा श्वासाचा त्रास जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.