कारखाना अडचणीत आहे म्हणून दादा बापू एकत्र आले, आणि २१ जागांसाठी आतापर्यंत विक्रमी 339 अर्ज आले, छत्रपती बिनविरोध नाहीच?

भवानीनगर : छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शेतकरी कृती समितीचे पृथ्वीराज जाचक एकत्र आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तशी घोषणाच केली. पुढील काळात जाचक हेच नेतृत्व करतील असे अजित पवार यांनी सांगितले आहे. असे असताना मात्र कार्यक्षेत्रात इच्छूक भावी संचालकांनी विक्रमी अर्ज दाखल केले आहेत.
गेल्या चार दिवसात छत्रपती कारखान्यासाठी तब्बल 339 जणांनी संचालक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, अजून एक दिवस बाकी असल्याने हा आकडा अजून वाढणार आहे. यामुळे आता कोण माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी पवार आणि जाचक यांचेच दोन पॅनल समोर समोर येतील अशी शक्यता असताना दोघे एकत्र येण्यामुळे कारखाना बिनविरोध होणार असं बोललं जात होते.
असे असताना अनेकांनी अजित पवार आणि जाचक यांच्याकडे फिल्डिंग लावली आहे. अजित पवारांनी जुन्या संचालक मंडळातील कोणाला संधी देणार नसल्याचे सांगितले असल्याने अनेक इच्छुकांनी आता अर्ज भरले आहेत. मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होण्याने अर्ज माघारी घेताना अनेक घडामोडी घडतील. या सगळ्या पार्श्वभूमीवर छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीसाठी महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत.
कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सुनील काळे हे त्यांचा जिजामाता पॅनल उभा करण्याची तयारी करत आहेत, कार्यक्षेत्रात त्यांनी फ्लेक्स लावून आधीच वातावरण गरम केले आहे. तसेच भारतीय जनता पक्षाचे नेते तानाजी थोरात व अविनाश मोटे यांनी देखील आपण निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. घोलप गटाने आपली भूमिका अजून जाहीर केली नाही.
15 एप्रिल हा शेवटचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल होतील असे बोलले जात आहे, त्याचा विचार करता कारखान्याच्या संचालक पदासाठी उमेदवारी अर्जाची संख्या अजून वाढेल. यामुळे आता येणाऱ्या काळात नेमकं काय घडणार याकडे सर्व सभासदांचे लक्ष लागले आहे.