पालकमंत्र्यांच्या मनमानीला चाप ; निधी वाटपाच्या नव्या धोरणास मंत्रिमंडळाची मंजुरी


पुणे: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधी वाटपाच्या नवीन धोरणास मंजुरी देण्यात आली आहे. या धोरणामुळे आता जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात पालकमंत्र्याकडून होणाऱ्या मनमानीला चाप लावण्यात आला आहे. तसेच या धोरणामुळे निधी वाटपात शिस्त देखील आणली जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीवाटपात शिस्त आणण्यासाठी काही महिन्यांपूर्वी सर्व खात्यांचे सचिव व संबंधितांची बैठक घेतली होती. धोरणात महत्त्वाचे बदल सुचविण्यासाठी समिती नियुक्त केली होती. त्यानंतर तयार करण्यात आलेले नवीन धोरण मंगळवारी मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात आले. त्यावेळी काही मंत्र्यांनी आणखी काही सुधारणाही सुचविल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या मंजुरीने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पाच टक्क्यांपर्यंतची रक्कम तातडीच्या किंवा आपत्कालीन खर्चासाठी वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे.– जिल्हा नियोजन समितीने वर्षभरात किमान चार बैठका घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. पालकमंत्र्यांनी या निधीतून करावयाची कामे शक्यतो एप्रिलमध्येच जाहीर करावीत व त्यासाठीच्या निधीची माहिती द्यावी. कोणत्याही कामासाठी मंजूर केलेला निधी वाया जाणार नाही, याची काळजी घ्यावी व त्यादृष्टीने कामाची प्रगती पाहून निधी द्यावा.

– जिल्हा निधीपैकी ७० टक्के निधी राज्यस्तरीय योजनांसाठी व ३० टक्के निधी स्थानिक कामांसाठी वापरता येईल. या निधीचा वापर कोणत्या कामांसाठी करता येईल व कोणत्या कामांसाठी करता येणार नाही, याची चौकट आखून देण्यात आली आहे. त्याचबरोबर २५ नवीन कामेही या निधीतून करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

– वापरण्याची मुदत संपण्याची वेळ जवळ आली असताना औषधांची खरेदी करण्यात येऊ नये, किमान दोन वर्षे मुदत असलेलीच औषधे खरेदी करण्यात यावीत. – जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून बाजारभावापेक्षा अधिक दराने वस्तूंची खरेदी करण्यात येऊ नये. आवश्यकतेनुसार केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या वस्तूंच्या किमती तपासून त्यानुसार खरेदीचा निर्णय घ्यावा.

दरम्यान पालकमंत्री ज्या पक्षाचा असेल, त्या पक्षातील आमदार व नेत्यांना जिल्हा नियोजन समितीच्या निधीवाटपात झुकते माप मिळते. अन्य पक्षांच्या आमदारांनी सुचविलेल्या कामांना निधी मिळत नाही. काही वेळा अनावश्यक खरेदी होते, औषध खरेदी झाल्यावर ती दोन-चार महिन्यांत कालबाह्य होतात, बाजारभावापेक्षा अधिक दराने खरेदी केली जाते, आदी अनेक तक्रारी डीपीडीसी निधीवाटपाबाबत करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता निधी वाटपाच्या नव्या धोरणास मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!