कोट्यावधी रुग्णांना बसणार मोठा फटका, ‘या’ आजारांवरील औषधे १ एप्रिलपासून महागणार..

मुंबई : अत्यावश्यक औषधांच्या दरात १ एप्रिलपासून वाढ होणार आहे. देशभरातील कोट्यवधी रुग्णांना औषधांच्या वाढलेल्या किमतींचा फटका बसणार आहे. याचा थेट परिणाम सामान्यांच्या खिशावर होणार आहे. कॅन्सर, मधुमेह, हृदयरोगांसाठी लागणाऱ्या गोळ्या आता महाग होणार आहेत.
राष्ट्रीय औषधी मूल्य निर्धारण प्राधिकरण या केंद्रीय संस्थेने औषध कंपन्यांना दरवाढीसाठी हिरवा कंदील दिला आहे. यामध्ये राष्ट्रीय आवश्यक औषध यादी अंतर्गत येणाऱ्या अत्यावश्यक औषधांचाही समावेश आहे.
केंद्र सरकारने याआधी अनेक औषधांना किंमत नियंत्रण यादीत समाविष्ट करून दरवर्षी सुमारे ३, ७८८ कोटी रुपयांची बचत सामान्य रुग्णांना करून दिली होती. मात्र आता याच औषधांमध्ये किंमत वाढ होणार असल्याने रुग्णांच्या खिशाला झळ बसणार आहे.
विशेषतः कर्करोग, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार आणि अँटिबायोटिक्ससारख्या जीवनावश्यक औषधांच्या किमतीत १.७ टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. ही दरवाढ लवकरच लागू होणार असून, रुग्णांना पुढील आदेश येईपर्यंत ही वाढीव किंमतच मोजावी लागणार आहे. औषध कंपन्यांसाठी ही दिलासा देणारी बाब असली, तरी सामान्य नागरिकांसाठी हा आर्थिक ताण वाढवणारा निर्णय ठरतोय.
दरम्यान, . दरवर्षी औषधांच्या घाऊक दरात महागाईनुसार बदल होत असल्याने, कंपन्यांना किमती वाढवण्याची परवानगी दिली जाते. यंदा वायपीआय मध्ये झालेल्या वाढीमुळे ही किंमतवाढ अपरिहार्य ठरली आहे. ही दरवाढ अँटिबायोटिक्स, पेनकिलर्स, हायपरटेन्शन, डायबेटीस आणि कॅन्सरवरील औषधांमध्ये लागू होणार आहे.