माळेगावसाठी मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी, चेअरमन पदाचे नाव कसं पुढं आलं? पृथ्वीराज जाचक देणार होते राजीनामा, अजित पवारांनी सगळंच सांगितलं…

बारामती : येथील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक चांगलीच गाजली. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकहाती सत्ता घेत 21 पैकी 20 जागा जिंकल्या. यानिमित्ताने आज अजित पवार यांनी आभार मेळावा घेतला. यावेळी त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला. यावेळी त्यांनी सगळ्या घडामोडी सांगितल्या.
अजित पवार म्हणाले, माळेगावच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर आहात, आपण महायुतीमध्ये एकत्र आहोत, तर तुम्हाला थोडे समजून घ्यावे लागेल. त्यानंतर आपण गप्प बसलो आणि तेव्हा हा चर्चेचा विषय पुढे आला. यावेळी छत्रपतीचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनीही मध्यस्थी केली होती.
यावेळी असं ठरलं की, दोन्ही पॅनलचे अर्ध अर्धे लोक व मी एकविसावा असे ठरले होते. पहिले अडीच वर्ष सहकार बचाव पॅनलला अध्यक्षपद अशी मध्यस्थ केली होती. जर ठरल्यानुसार अजित पवार वागले नाहीत, तर मी छत्रपतीचे चेअरमन पद राजीनामा देतो असे जाचक म्हणाले होते.
असे असतानाही त्यांनी ऐकले नव्हते. शरद पवार गटाला देखील दोन जागा देतो असे सांगितले होते. मात्र त्यांचा काही निरोप आला नाही. ज्यावेळी माझ्या लक्षात आले की, मला पॅनलच करावा लागेल, त्यावेळीही माझ्या मनात कुठेही मला संचालक किंवा अध्यक्ष व्हायचे नव्हते. मात्र माझ्या पॅनल मधील अध्यक्ष पदासाठी सहा ते सात लोक चेअरमन पदासाठी इच्छुक होते. त्यामुळे मला माझेच नाव पुढे करावे लागले, असेही ते म्हणाले.
माझ्या लक्षात आले की, मी कितीही त्यांना पदे दिली की तेवढ्यापुरती असते दादा दादा करतात. मात्र पुढाऱ्यांनी जरी काहीही केले, तरी बारामतीला सर्वसामान्य माणूस माझ्या पाठीशी आहे, मग माझ्या नावाने विचार केला, असेही अजित पवार म्हणाले. माळेगावच्या निवडणुकीडे राज्याचे लक्ष लागले होते.