कोरेगाव भीमा कार्यक्रमात चोरांनी चोरलेल्या दोन कार पुन्हा त्याच ठिकाणी, पोलीसही चक्रावले, नेमकं घडलं काय?

पुणे : कोरेगाव भीमा विजयस्तंभ येथे संभाजीनगर व सोलापूरहून अभिवादनासाठी आलेल्या अनुयायांच्या दोन कार शिक्रापूर येथील पोलीस बंदोबस्तात असलेल्या पार्किंगमधून चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आली होती. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांत कार चोरीबाबत गुन्हा दाखल झाला.
तसेच दोन दिवसांनी चोरी केलेल्या दोन्ही कार अज्ञातांनी पुन्हा त्याच ठिकाणी आणून लावल्याच्या घटना घडल्या मात्र सदर घटनेने शिक्रापूर पोलीस देखील चक्रावून गेले आहेत.
नेमकं घडलं काय?
कोरेगाव भीमा विजयस्तंभ येथे १ जानेवारी रोजी संभाजीनगरहून पद्माकर हिवराळे हे त्यांच्या ताब्यातील एम एच २० एफ जि ७११६ या स्विफ्ट तर सोलापूरहून सुर्यकांत गायकवाड हे त्यांच्या ताब्यातील एम एच ४३ आर ६९३३ या इनोव्हा कारमधून आपल्या सहकाऱ्यांसमवेत आले होते. त्यांनी त्यांच्या कार शिक्रापूर येथील जित हॉटेल समोरील पार्किंगमध्ये लावल्या. येथून शासकीय बसने अभिवादन स्थळी गेले.
दुपारच्या नंतर पुन्हा पार्किंगमध्ये आले त्यावेळी कार चालक पद्माकर हिवराळे व सुर्यकांत गायकवाड या दोघांना त्यांच्या कारची चावी त्यांच्या कमरेला नसल्याचे दिसल्याने त्या दोघांनी कारची पाहणी केली. दोन्ही कार चोरीला गेल्याचे समोर आले.
याबाबत पद्माकर नामदेव हिवराळे (वय ३७ वर्षे रा. सहारा परिवर्तन सोसायटी जळगाव रोड संभाजीनगर) व सुर्यकांत मुकिंद गायकवाड (वय २८ वर्षे रा. गणेशनगर ता. सोलापूर जि. सोलापूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हा दाखल करत तपास सुरु केला.
पोलीस गेले चक्रावून..
शिक्रापूर पोलिसांचे वेगवेगळे पथक परिसरातील सीसीटीव्ही तपासात कार चोरीचा तपास करत असताना ३ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास सदर जित हॉटेल समोरील पार्किंगमध्ये दोन नंबर नसलेल्या कार उभ्या असल्याबाबत पोलिस स्टेशनमध्ये फोन आला.
पोलीस पार्किंगकडे जाताच चक्रावून गेले. पोलीस ज्या कार चोरीचा तपास करत होते त्या दोन्ही कार तेथे उभ्या असल्याचे दिसले. तर पोलिसांनी दोन्ही कार ताब्यात घेतल्या. पोलिसांना अशा पद्धतीने चोरीची झलक दाखवणाऱ्या चोरट्यांचा पोलीस हवालदार गणेश करपे व बापू हाडगळे यांसह आदी पोलीस शोध घेत आहेत.