‘उरुळीकांचन’च्या प्रसिद्ध कल्याण मटका अड्डावर पत्ते पिसिंग; दौंडच्या उपविभागीय कार्यालयाकडून धाडीत सहा जुगारी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल..


उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथे कल्याण मटका नावाचा जुगार खेळला जात असल्याची बाब समोर आली आहे. बाजार मैदान परिसरातील सम्राट कामगार संस्था कार्यालयाच्या आडोशाला सुरू असलेल्या या जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समोवारी (ता. १२) रोजी दुपारी सुमारे १ वाजून ३५ मिनिटांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाजार मैदान येथील सम्राट कामगार संस्था कार्यालयाच्या आडोशाला ही कारवाई करण्यात आली. यावेळी संबंधित व्यक्तींकडे जुगाराची साधने आणि रोख रक्कम आढळून आली.

या प्रकरणी संजय पांडुरंग पवार (वय ३८), संतोष शिवाजी कांचन (वय ४२), समाधान बबन रेवडकर (वय ३०), मुसा ताजुद्दीन फुलारी (वय ४५), मनोज रामदास काकडे (वय ५०) आणि संतोष रामचंद्र चव्हाण (वय ४५) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्वजण पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन, कुंजीरवाडी आणि यवत परिसरातील रहिवासी आहेत.

दरम्यान, या कारवाईत पोलिसांनी १२ हजार ७० रुपये रोख, पाच निळ्या शाईचे बॉलपेन आणि पाच स्लिप बुक जप्त केले आहेत. याप्रकरणी मुंबई जुगार कायद्याच्या कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी मनोज रामदास काकडे याच्याविरुद्ध यापूर्वीही जुगार कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार गाडेकर करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!