सीए अंतिम परीक्षेचा निकाल घोषित, अंतिम परीक्षेत मुंबईतील राजन काबरा अव्वल…

मुंबई : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) यांनी मे २०२५ मध्ये घेतलेल्या फाउंडेशन, इंटरमिजिएट आणि फायनल परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. सीए अंतिम परीक्षेत मुंबईचा राजन काबरा याने ६०० पैकी ५१६ गुण मिळवत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.
त्याच्या या घवघवीत यशामुळे महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. या परीक्षांमध्ये देशभरातून हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. फाउंडेशनमध्ये गाझियाबादच्या वृंदा अगरवालने आणि इंटरमिजिएटमध्ये मुंबईच्या दिशा गोखरूने देशात पहिल्या क्रमांकावर नाव नोंदवलं आहे. ICAI ने निकाल जाहीर करताच सोशल मीडियावर यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन सुरू झाले आहे.
दरम्यान, मे २०२५ मध्ये झालेल्या सीए फायनल परीक्षेसाठी ग्रुप 1 मध्ये 66,943 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 14,979 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यशाचे प्रमाण 22.38% आहे. ग्रुप 2 मध्ये 46,173 परीक्षार्थींमध्ये 12,204 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याचे यशाचे प्रमाण 26.43% आहे. दोन्ही गटांची एकत्रित परीक्षा दिलेल्या 29,286 विद्यार्थ्यांपैकी 5,490 जणांनी यश मिळवलं असून, या गटाचे यशाचे प्रमाण 18.75% इतकं नोंदवण्यात आलं आहे.
राजन काबरानंतर कोलकाताच्या निशिता बोथ्रा हिने 503 गुणांसह दुसरा आणि मुंबईच्या मानव शहा याने 493 गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला आहे. मुंबईतील विद्यार्थ्यांनी यंदाच्या निकालात वर्चस्व राखत राज्याचं नाव उज्वल केलं आहे.
इंटरमिजिएट परीक्षेत ग्रुप 1 साठी 97,034 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यात 14,232 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यशाचे प्रमाण 14.67% आहे. ग्रुप 2 मध्ये 72,069 विद्यार्थ्यांपैकी 15,502 विद्यार्थी यशस्वी झाले असून, यशाचे प्रमाण 21.51% आहे. दोन्ही गटांची एकत्र परीक्षा दिलेल्या 38,029 विद्यार्थ्यांपैकी 5,028 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्याचे यशाचे प्रमाण 13.22% इतके आहे.