अखेर हिंगणगाव ते खामगाव टेक या नदीजोड पुलाच्या कामाचा मार्ग मोकळा..!

उरुळी कांचन : हवेली तालुक्यात अनेक वर्षापासून मागणीसाठी असलेला हिंगणगाव ते खामगाव टेक हा मुळा मुठा नदीवरुन एकमेकांना जोडणारा पूल अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजूर झाल्याची हवेली तालुका शिवसेना (शिंदे ) गटाचे अध्यक्ष विपुल शितोळे यांनी दिली.
हिंगणगाव ते खामगाव टेक नदीजोड पुलाचे शिंदेवाडी, न्हावी सांडस ,सांगवी सांडस या ग्रामस्थांचे १० किलोमीटरवरील वळसा घालून पडणारे अंतर वाचणार आहे. या पुलाच्या मागणीसाठी हिंगणगाव, शिंदेवाडी या गावातील ग्रामस्थांनी शासन मागणी पूर्ण करीत नाही म्हणून मुळामुठा नदीत जलसमाधी आंदोलन करुन राज्य शासनाचे लक्ष वेधले होते.
यावेळी आंदोलकांना पूल मंजूर करुन देण्याचे आश्वासन माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी दिले होते. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘पीएमआरडी’ चे आयुक्त राहुल महिवाल यांना या कामाविषयी तातडीने अहवाल द्यावा असे आदेश दिले होते.
त्यानुसार हिंगणगाव ते खामगाव टेक पुलासाठी २५ कोटी रुपये, व तुळापूर ते भावडी या रस्त्यासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यासंदर्भात काही सूचना देण्यात आल्या होत्या.त्यानुसार पीएमआरडीए च्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून तसा अहवाल शासन दरबारी सादर केला होता.
सदर पूलाच्या कामासाठी पीएमआरडीए पथकाने माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवार (दि.८) रोजी अंतिम स्थळ पाहणी केली.
यावेळी बांधकाम आणि रस्ते विभागाचे मुख्य अभियंता भालकर, कार्यकारी अभियंता कानगावे, कनिष्ठ अभियंता, स्वरीफ सिंग, शेरागुपे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अलंकार कांचन, कृती समितीचे अध्यक्ष अंकुश कोतवाल माजी सरपंच कुंडलिक थोरात,
भवरापुरचे सरपंच सचिन सातव आदी उपस्थित होते.