पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत बॉम्बस्फोट केलेल्या चौघांची फाशी रद्द, हायकोर्टाचा मोठा निर्णय..

नवी दिल्ली : पटनामध्ये ११ वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत बॉम्बस्फोट घडवून आणलेल्या चौघा आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. पटना हायकोर्टाने फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत केले आहे.
आज (ता. ११) कोर्टाने हा महत्वपूर्ण निकाल दिला आहे. मोदींच्या पटना येथील गांधी मैदानात झालेल्या सभेत २४ ऑक्टोबर २०१३ रोजी बॉम्बस्फोट झाला होता. मोदींच्या सभेवेळी पटना जंक्शनच्या फलाट क्रमांक १० वर असलेल्या शौचालयात पहिला बॉम्बस्फोट झाला.
त्यानंतर गांधी मैदान तसेच इतर सहा ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाले होते. यामध्ये सहा जणांचा मृत्यू तर ८९ जण जखमी झाले. त्यावेळी सुशील कुमार शिंदे हे केंद्रात गृहमंत्री होते.बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर गांधी मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर या घटनेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात आला. ‘एनआयए’ ने सर्व आरोपींविरोधात २०१४ मध्ये आरोपपत्र दाखल केले होते. कोर्टात १८७ जणांनी जबाब दिला. त्यानंतर स्थानिक कोर्टाने इम्तियाज आलम, हैदर अली, नुमान अंसारी आणि मोजिबुल्ला अंसारी यांना दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती.
पटना येथील स्थानिक न्यायालयाने चार आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. त्याला आरोपींनी हायकोर्टात आव्हान दिले होते. दरम्यान आता बॉम्बस्फोट प्रकरणातील चार आरोपींना ३० वर्ष तुरुंगवासाठी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर यापूर्वीच आजीवन कारावासाची शिक्षा सुनावलेल्या दोन आरोपींची शिक्षा कोर्टाने कायम ठेवली आहे.