एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची फिल्डिंग! स्वबळावर लढणार, नेमकं घडतंय काय?

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यात आता भाजपकडूनही आगामी महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. महायुतीत एकत्र लढण्याची घोषणा नेत्यांकडून केली जात असली, तरी स्थानिक पातळीवर मात्र भाजपने स्वबळावर लढण्याचे संकेत देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.

तसेच ठाणे शहरातील भाजपने अलीकडेच इच्छुक उमेदवारांकडून फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या माध्यमातून प्रत्येक इच्छुक उमेदवाराने आपल्या प्रभागात आतापर्यंत किती काम केले आहे आणि किती लोकप्रिय आहे, याचा आढावा घेण्यात येणार आहे.

यामुळे उमेदवार निवड गुणवत्तेवर आधारित असेल, असे स्पष्ट संकेत पक्षाकडून दिले गेले आहेत. भाजपकडून ठाण्यात इच्छुक उमेदवारांना अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या फॉर्मच्या माध्यमातून पक्ष उमेदवाराच्या स्थानिक पातळीवरील कामगिरी, जनसंपर्क आणि मतदारांतील प्रभाव तपासणार आहे. त्यानंतरच संबंधित उमेदवाराला अधिकृत ‘एबी फॉर्म’ देण्यात येईल.

दरम्यान, ही प्रक्रिया निवडणुकीपूर्वी स्थानिक संघटनात्मक ताकद तपासण्यासाठी आणि योग्य उमेदवार निश्चित करण्यासाठी राबवली जात आहे. भाजपने या पद्धतीने ठाण्यातील मतदारसंघनिहाय स्थिती समजून घेत, आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
ठाणे महानगरपालिका ही पारंपरिकरित्या शिवसेना (शिंदे गट) ची मजबूत गढी राहिली आहे. मात्र, आता भाजपनेही स्वतंत्र रणनीती आखल्याने आगामी निवडणुकीत महायुती एकत्र लढेल का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
अलीकडेच भाजपचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे , जिल्हाध्यक्ष संदीप लेले, तसेच महिला मोर्चा आणि इतर पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक वर्तक नगर कार्यालयात झाली. या बैठकीत ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भातील तयारी आणि संभाव्य उमेदवारांची चर्चा करण्यात आली.
त्याचवेळी, शिवसेना शिंदे गटानेही स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आनंद आश्रम येथे झालेल्या बैठकीत माजी नगरसेवकांनी स्वबळाची भूमिका घेतली होती. त्यामुळे दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याचे संकेत दिल्याने महायुतीत अंतर्गत तणाव वाढू शकतो.
