पुण्यातील कोंढवा अत्याचार प्रकरणात मोठा ट्विस्ट, घटनेनंतरच्या CCTV व्हिडीओने उडाली खळबळ…

पुणे : कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये बुधवारी रात्री एक अज्ञात इसम ‘कुरिअर बॉय’ बनून घरात शिरला आणि २५ वर्षीय तरुणीवर केमिकल स्प्रे मारून अत्याचार केला. या घटनेने पूर्ण पुणे हादरले आहे.
या प्रकरणात आता पोलिस तपासात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या प्रकरणातील संशयित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तो कुरिअर बॉय किंवा अन्य दुसरा कोणी नसून, तिचाच मित्र असल्याचे पुढे आले आहे. तरुणीने पोलिसांपासून ही गोष्ट लपवून ठेवली होती. तसेच घटनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या स्प्रेचा वापर झाला नव्हता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढंच नाही तर तरुणीने आणखी एक कांड केला होता.
यातच आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे मोबाईलमध्ये काढलेला सेल्फी तरुणीने एका ॲपच्या माध्यमातून एडिट करून त्याखाली मेसेजही तिनेच लिहिल्याचे उघड झाले आहे, अशी कबुली तरुणीने दिली असून, तरुणाने आपल्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे मात्र म्हटले आहे. त्यामुळे पोलिस लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा तपास करीत आहेत, तर दुसरीकडे तरुणीने बोलाविल्यानंतर आपण तिच्या घरी गेल्याचा दावा या तरुणाने केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेला संशयित आरोपी तरुण एका मल्टिनॅशनल कंपनीत चांगल्या पदावर नोकरी करतो. तो मागील एक वर्षापासून तरुणीच्या संपर्कात आहे. दोघांचा परिचय त्यांच्या एका समाज मेळाव्यात झाला होता. तांत्रिक तपासात तो बाणेर येथील कंपनीत कामाला असताना तरुणीला फूड डिलिव्हरी ॲपच्या माध्यमातून अनेकदा खाद्यपदार्थ ऑर्डर करून पाठवत होता.
घटनेच्या दिवशी तो सोसायटीतील सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्याचे छायाचित्र पोलिसांनी दाखवल्यावर मात्र पीडितेने त्याला ओळखत नसल्याचे सांगितलं. तो तिच्या सदनिकेत सव्वासात वाजता जाताना दिसत आहे. तर सदनिकेतून पावणेनऊला बाहेर पडत आहे. विशेष म्हणजे संबंधित तरुणाने सीसीटीव्ही कॅमेरा असलेल्या लिफ्टचा वापर केला नाही तर पायऱ्यांचा वापर करत पळ काढला, असं एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधून समोर आलं आहे.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तो तरुणीच्या सांगण्यानुसारच तिच्या घरी आला होता. दोघांच्या संभाषणाचे काही व्हॉट्सॲप चॅटिंग देखील पोलिसांना मिळाले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.