एसटी महामंडळात मोठा भुकंप! तब्बल 1000 अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या, नेमकं कारण काय?

मुंबई : एसटी महामंडळात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने इतर ठिकाणी बदली करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. एकाच वेळी 50-100 थेट जवळपास एक हजार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहे.
एसटी महामंडळात मागील 3 वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या तातडीने बदली करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाला दिले. त्यामुळे किमान 1000 अधिकाऱ्यांवर बदलीची टांगती तलवार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेत चर्चा केली. अनेक अधिकारी एकाच मुख्यालयात वर्षानुवर्ष ठाण मांडून बसल्यामुळे त्यांचे काही ठराविक कर्मचाऱ्यांशी हितसंबंध निर्माण होतात.
यामुळे अनेकदा अडचण निर्माण होते. यामध्ये ते इतर कर्मचाऱ्यांवर अन्याय करतात. याबाबत अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, असेही परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
याबाबत विपरीत परिणाम एस टी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर होत असल्याचा दावा त्यांनी केला. भविष्यात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी बैठकीत केली होती असेही प्रताप सरनाईक यांनी म्हटले.
दरम्यान, या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्यासंदर्भातही सविस्तर चर्चा झाली. यामुळे येणाऱ्या काळात एसटी महामंडळात अनेक बदल बघायला मिळणार आहेत. तसेच बदल्यामुळे आर्थिक शिस्त देखील येईल, असेही सांगितले जात आहे.