मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मोठा परिणाम! मराठा-कुणबी जात प्रमाणपत्राबाबत आली महत्त्वाची अपडेट

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा सरकारविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली आहे. अंतरवाली सराटी येथे गेल्या दहा दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर सरकारमधील अनेक नेत्यांकडून जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली जात आहे. काही मंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट घेतली, तर दोन नेत्यांनी मध्यरात्री फोन करून त्यांच्या तब्येतीची माहिती घेतली.

मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत येऊन उपोषण करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर प्रशासकीय पातळीवरही हालचाली वाढल्या असून, जालना जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्राच्या वितरणासंदर्भातील महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे.


प्रशासनाच्या माहितीनुसार, न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन झाल्यापासून जालना जिल्ह्यात जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 18 हजार 262 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी तब्बल 18 हजार 243 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. तर 19 अर्ज नामंजूर करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान, 2 सप्टेंबर रोजीच्या शासन निर्णयानुसार हैदराबाद गॅझेटच्या आधारे जालना जिल्ह्यात 421 अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे 1 हजार 597 अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 5 अर्ज वैध ठरल्याची माहिती समोर आली आहे.
मराठा-कुणबी प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरं
जालना जिल्ह्यात मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जात प्रमाणपत्राच्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी प्रशासनाकडून विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. जुन्या नोंदी आणि आवश्यक कागदपत्रांसाठी नागरिकांना वारंवार सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.
जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील एकूण 62 मंडळांमध्ये 16 सप्टेंबरपर्यंत ही विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या माध्यमातून पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
तक्रारी आणि अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रशासनाकडून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्राच्या प्रक्रियेला आलेला वेग आता चर्चेचा विषय ठरला आहे.