शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! गाईच्या दूध दरामध्ये 2 रुपयांची वाढ, मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

कोल्हापूर : राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक मोठी घोषणा केली आहे गोकुळकडून गाय दूध खरेदी दरामध्ये 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. उद्या 1 एप्रिलपासून ही दरवाढ लागू होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गोकुळ पेट्रोल पंप उद्घाटन आणि सायलेज बेलर व हार्वेस्टर मशिनरी प्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. दूध पावडर व बटरचे दर वाढल्यामुळे गाय दूध खरेदी दर वाढविण्यात येत असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. गाईच्या दूध खरेदी दरात वाढ करून गोकुळने गाय दूध उत्पादकांना पाडव्याची भेट दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गाय दूध उत्पादक शेतकर्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
सध्या गाईचा दूध खरेदी दर 30 रुपये प्रतिलिटर होता, तो आता 32 रुपये प्रतिलिटर करण्यात आला आहे. तर काही महिन्यापूर्वी गोकुळने म्हशीच्या दूध खरेदी दरात वाढ केली होती. 25 लाख लिटर संकलनाचे उद्दिष्ट गाठायचे असेल तर सभासदांनी म्हशींची संख्या वाढविली पाहिजे. गोकुळचे पाच लाख सभासद आहेत. त्यातील दोन लाख सभासदांनी प्रत्येकी एक म्हैस खरेदी केली तर आपण 25 लाखांचा टप्पा पूर्ण करू.
यासाठी जिल्हा बँकेतून कर्ज देण्याची व्यवस्था करू, असेही ते म्हणाले. मुंबई, पुणेसारख्या मोठया शहरात गोकुळच्या म्हैस दुधाची विक्री जास्त आहे. ग्राहकांकडून दूध पावडर, बटरला मागणी वाढत आहे. भविष्यकालीन विचार करुन पुणे आणि मुंबईत मिळून गोकुळचे दोन प्रकल्प सुरू करावे लागतील.
पॅकिंग युनिटला या दोन्ही शहरातील प्रकल्पामध्ये जागा अपुरी पडत असल्याने संचालकांनी नव्या प्रकल्प उभारणीची तयारी करावी,” असे आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गट नेते सतेज पाटील अध्यक्षस्थानी होते. खासदार शाहू महाराज आणि आमदार चंद्रदीप नरके यांची प्रमुख उपस्थिती होती.