मोठी बातमी! कृत्रिम वाळू धोरणास मंजुरी, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ६ महत्त्वाचे निर्णय..

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. त्यामध्ये, ६ महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून राज्यात फिरते पथक योजना सुरू करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

राज्यात कृत्रिम वाळू धोरणास मंजुरी देण्यात आली असून, प्रत्येक जिल्ह्यात ५० पर्यंत युनिट स्थापन करण्यासाठी सवलती देण्यात येणार आहेत. प्रत्येक युनिटला प्रति टन ₹200 पर्यंत सवलत मिळेल. यामुळे नैसर्गिक वाळूवरील अवलंबित्व कमी होणार असून पर्यावरणाची हानी टळणार आहे.
दुसरीकडे, रस्त्यावर राहणाऱ्या किंवा भटकंती करणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात २९ महापालिका क्षेत्रात ३१ मोबाईल व्हॅन कार्यरत राहतील. यासाठी ₹8 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.

राज्यातील शासकीय आयटीआय संस्थांचे अद्ययावतीकरण सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे आयटीआयला जागतिक दर्जाचं प्रशिक्षण केंद्र बनवण्याचा सरकारचा मानस आहे. रोजगारक्षमता वाढवणं, प्रॅक्टिकल आणि अप्लाईड लर्निंग यावर भर दिला जाणार आहे.

दरम्यान, याशिवाय, राष्ट्रीय न्यायवैद्यक शास्त्र विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी नागपूर जिल्ह्यातील चिंचोली येथे २०.33 हेक्टर जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपकेंद्रामुळे वैद्यक शिक्षण व संशोधनाला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.