बारामतीच्या सूरज चव्हाणला अजितदादांकडून ‘मोठं’ गिफ्ट; सूरजचे स्वप्न होणार पूर्ण…

पुणे : ‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता सूरज चव्हाणची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकल्यानंतरही सूरज चव्हाण ट्रेडिंगला आहे. अशातच सूरज चव्हाण याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अजित पवार यांनी सूरज चव्हाणला घर बांधून देण्यासह इतर सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बिग बॉस विजेता सूरज चव्हाण याचा सत्कार करण्यात आला. अजित पवार यांनी त्याच्या कुटुंबाची विचारणा केली. दरम्यान, सूरज चव्हाण याचा अजित पवारांनी सत्कार केला. यावेळी अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
काय म्हणाले अजित पवार?
सूरज हा आमच्या बारामती मधील मोढवे गावाचा रहिवासी आहे. सुरुवातीला रिल्स काढत असताना सुरजला बिग बॉसमध्ये संधी मिळाली. सूरजचा मनमोकळा स्वभाव आणि थोडं बोलण्यात अडकण हे लोकांना भावल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच सुरजला 2 बीएचके घर बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचं पुढचं आयुष्य सुखकर होण्यासाठी मी रितेश देशमुखशी बोलणार असल्याचे ते म्हणाले.
आम्ही त्याला एकटं सोडणार नाही, आम्हाला जमेल तेवढी मदत त्याला करू. सूरजची ज्याच्यावर जबाबदार देईल त्यानेच जर सुरजला झटका तर कसं व्हायचं. आम्ही जबाबदारी देऊ त्याच्यावर सूरजचाही विश्वास पाहिजे. आम्ही एखाद्याला जबाबदारी द्यायचो अन् त्यालाच वेगळी चटक लागायची, कारण सूरजची पाटी पूर्ण कोरी आहे. त्याची आता सुरूवात आहे, आमच्या तालुक्याचा सुपुत्र असल्याने त्याचा आम्हाला अभिमान आहे. जिथे जिथे सूरजला गरज लागेल तिथे तिथे सूरजला माझे पूर्ण सहकार्य राहणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे.