सुनेत्रा पवार यांचा देशात विक्रमी मताधिक्याने विजय होणार का? बारामती पोटनिवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष..

बारामती : बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू असून सकाळी ९ वाजेपर्यंत ८.१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सुरुवातीच्या तासांत मतदानाचा वेग तुलनेने मंद असल्याचे चित्र दिसत आहे.

ही पोटनिवडणूक दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी होत आहे. मतदानासाठी प्रशासनाने सर्व केंद्रांवर आवश्यक सुविधा आणि सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे.
उमेदवार तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सकाळी दिवंगत अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी जाऊन दर्शन घेतले तर त्यांच्या मातोश्री आशाताई पवार यांचे आर्शिवाद घेतले. त्यानंतर काठेवाडीत जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. तर राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही सकाळीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सर्वपक्षीयांनी उमेदवार सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देऊ केला आहे. कालच सकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही सुनेत्रा पवार यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत प्रचारसभा घेऊन सुनेत्रा पवार यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करा असे आवाहन केल्याने सुनेत्रा पवार या देशात विधानसभेला सर्वाधिक मताधिक्याने विजयी होणाऱ्या उमेदवार ठरतील काय असाच कयास या निवडणुकीत बांधला जात आहे.

दरम्यान सकाळच्या सत्रात मतदारांनी सकाळच्या सत्रात कमी प्रमाणात मतदान केले असले तरी दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय दृष्टीने महत्त्वाच्या या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मतदान सायंकाळपर्यंत सुरू राहणार असून अंतिम टक्केवारीत मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे.