आजपासून भारत गौरव ट्रेन टूर सुरू होणार! मुंबई-पुणे-कोल्हापूर, कसा असेल प्रवास? जाणून घ्या..

पुणे : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने छत्रपती शिवाजी महाराज सर्किट भारत गौरव ट्रेन टूर सुरू केली आहे. यामुळे अनेक प्रवाशांना याचा फायदा होणार असून अनेकांनी आपली सीट बुक देखील केली आहे. आजपासून ९ जून २०२५ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून या ट्रेनच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे.

विशेष म्हणजे भारत गौरव ट्रेन टूरला १०० टक्के बुकिंगसह प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये ७१० प्रवासी या प्रवासाचा लाभ घेणार असल्याची माहिती इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड कडून देण्यात आली आहे. हा दौरा महाराष्ट्र सरकार आणि भारतीय रेल्वे यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित केला आहे.
यामध्ये पाच रात्री, सहा दिवसांच्या प्रवासात छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि भव्य वारसा दाखवणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज सर्किट भारत गौरव ट्रेन रायगड किल्ला, शिवनेरी किल्ला, प्रतापगड किल्ला, पन्हाळा किल्ला, लाल महाल, कसबा गणपती आणि शिवसृष्टी यासारख्या ऐतिहासिक स्थळांना भेट देणार आहेत.

यामुळे मोठा ऐतिहासिक वारसा आपल्याला यामध्ये अनुभवायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्किट भारत गौरव ट्रेनमध्ये ७१० प्रवासी संख्या आहेत. त्यापैकी ४८० प्रवासी इकॉनॉमीमध्ये (स्लीपर), १९० प्रवासी कम्फर्टमध्ये (३एसी) आणि ४० प्रवासी सुपीरियरमध्ये (२एसी) बुक झाले आहेत. मुंबई (सीएसएमटी)-रायगड-पुणे-शिवनेरी-भीमाशंकर-प्रतापगड-कोल्हापूर-पन्हाळा- मुंबई. रायगड किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक येथे झाला व ही राजधानी होती, असा प्रवास असणार आहे.

तसेच लाल महाल, पुणे. कसबा गणपती व शिवसृष्टी,पुणे – पुण्याचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय, शिवनेरी किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ, भीमाशंकर ज्योतिर्लिंग – १२ ज्योतिर्लिंग पैकी एक प्रमुख धार्मिक स्थळ, प्रतापगड किल्ला – अफझल खानावरील ऐतिहासिक विजयाचे ठिकाण, कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर, पन्हाळा किल्ला – बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक असा रूट असणार आहे.