Bharat Bandh : भारत बंदला मोठा प्रतिसाद! अनेक ठिकाणी निदर्शने, पोलीस अलर्ट…

Bharat Bandh : देशभरात बुधवार आज( ता.२१ ) रोजी भारत बंदची हाक देण्यात आली असून, दलित आणि आदिवासी संघटनांनी हा बंद पुकारला आहे. भारत बंदच्या या आंदोलनामध्ये बसपा, चंद्रशेखर आझादची पार्टी सहभागी झाली आहे.
या बंदला काँग्रेस, बसपा आणि आरजेडीसारख्या पक्षांनी पाठिंबा दिला आहे. नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ दलित अँड आदिवासी ऑर्गनायझेशन्स (एनएसीडीएओआर) ने उपेक्षित समुदायाचे मजबूत प्रतिनिधित्व आणि संरक्षणाच्या मागणीसाठी बंदची हाक दिली आहे.
एनएसीडीएओआरने एससी-एसटी आणि ओबीसींसाठी न्याय आणि समानता यासह मागण्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. या ‘बंद’ला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, बिहारमधील दरभंगा जिल्ह्यात अनेक ठिकाणी निदर्शने होत आहेत. येथे अनेक ठिकाणी जाळपोळही झाली आहे. तर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये पोलिस अलर्टवर आहेत.
भारत आज का बंद आहे?
सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वीच एक निर्णय दिला होता, ज्यामध्ये त्याने राज्य सरकारांना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांमध्ये स्वतंत्र प्रवर्ग तयार करण्यास मान्यता दिली होती. आरक्षणाचा लाभ सर्वाधिक गरजूंना मिळावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात निदर्शने होत आहेत. न्यायालयाच्या या निर्णयाला दलित आणि आदिवासींनी विरोध करत हे समाजाच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. हा निर्णय मागे घेण्याची मागणी न्यायालयाकडे केली जात आहे.
भारत बंद आंदोलनामुळे कोणावर होणार परिणाम?
राजकीय घडामोडींवर या आंदोलनाचा सर्वाधिक परिणाम होताना दिसणार आहे. ज्यामुळं सामाजिक न्यायाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी येणार असून, मोठ्या प्रमाणात निदर्शनं झाल्यास कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत येऊ शकते.
‘भारत बंद’ला या पक्षांनी दिला पाठिंबा…
दरम्यान, या ‘भारत बंद’ला बसपा, राजदने पाठिंबा दिला आहे. याशिवाय चिराग पासवान यांच्या पक्षानेही पाठिंबा दिला आहे. यासोबतच भीम आर्मीचे प्रमुख खासदार चंद्रशेखर आझाद, काँग्रेससह अन्य पक्षांच्या नेत्यांनीही या ‘बंद’ला पाठिंबा दिला आहे.