पुण्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार करुन खूनाचा प्रयत्न; चार जणांना सिंहगड रोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

पुणे : चौघांनी तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना धायरी येथील सिद्धार्थ कॉम्प्लेक्ससमोर शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
मनोज तुकाराम सूर्यवंशी (वय २०, रा. धायरी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
सिंहगड रोड पोलिसांनी सौरभ ऊर्फ दादा मोघे (वय १८), श्रावण रमेश हिरवे (वय १९, रा. गोसावी वस्ती, सिंहगड रोड), साहिल प्रकाश चिकणे (वय १९, रा. नांदेड फाटा), खंडु ऊर्फ बंटी रामभाऊ कांबळे (वय १९) असे अटक करण्यात आलेल्यांचे नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र रोहित पवार यांची सौरभ मोघे याच्याबरोबर गुरुवारी वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरुन आरोपींनी फिर्यादी याच्या डोक्यावर, कमरेवर, पाठीवर व हातावर कोयत्याने वार करुन त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन चौघांना अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक निकम तपास करीत आहेत.