कौतुकास्पद! ‘कमवा व शिका’ योजनेततून अमृता शिकली आणि तिने करून दाखवलं…

पुणे : घराची परिस्थिती बेताची असल्याने तीन `कमवा व शिका` योजनेत काम करीत शिक्षण पूर्ण केले. तर एम.पी.एस.सी.चा अभ्यास करताना पुण्यातील खर्चाची तोंडमिळवणी करताना तिने खासगी शिकवण्यांमध्ये काम करुन शेवटी यश खेचूनच आणले.
किल्ले पुरंदरच्या उपडोंगररांगेतील कुंभोशी (पो. केतकावळे, ता. पुरंदर) येथील दुर्गम भागातील अमृता भरत बाठे या अल्पभूधारक शेतकऱयाच्या कन्येनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उप निरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण होत खाकी वर्दीला गवसणी घालण्याचे स्वप्न साकारले आहे.
अमृता बाठे यांचे वडील भरत बाठे व आई सौ. संगिता दोघेही चार भातखाचरांची शेती करतात. बाकी क्षेत्र डोंगरपड, माळपड असेच असल्याने चांगल्या ठिकाणी शिकविण्याचे वडीलांचे स्वप्न अपुरे राहणार होते.
तसेच अमृताच्या मागे एक लहान भाऊ व एक बहीण यांचा कुटुंबावर भार होता. म्हणून स्वतःच्या कुंभोशी गावात चौथीपर्यंत जिल्हा परीषदेच्या मराठी शाळेत शिकल्यावर गावात हायस्कूल नसल्याने पंचाईत झाली.
याकाळात शेतीच्या व घरच्या कामात मोठी मुलगी म्हणून अमृताची कुटुंबात मदत होत असे. शेवटी वडीलांनी शोधून कन्या अमृतासाठी पुण्यात महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या संस्थेत मुलींच्या वसतीगृहात प्रवेश मिळविला.
इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण महर्षी कर्वे यांच्या महिलाश्रम हायस्कूल येथे पूर्ण झाले. शिकत असताना अमृता मैदानावरच्या विविध खेळांमध्ये सहभागी होत असे. त्यातून कबड्डी राज्यस्तरापर्यत व इतर खेळ विभागापर्यत खेळू शकली.
येथेच खेळामुळे शारिरीक क्षमतांचा विकास झाला आणि अमृताच्या मैत्रिणी पोलिस भरतीची तयारी करत होत्या त्यातूनच तिलाही वाटले आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे आणि पोलिस भरतीचा फाॅर्म भरुन तयारी नसताना परिक्षा दिली व त्यात तिला अपयश आले.
खाकी वर्दीचे स्वप्न तेही किमान पोलीस उप निरीक्षक होण्याचे मनात पक्के केले. मात्र त्यासाठी पदवी लागते, असे समजल्याने.. मग महाविद्यालयीन शिक्षणाकरीता महर्षी कर्वेच्या संस्थेतच पुण्यात श्री सिद्धिविनायक महाविद्यालयामधुन बी.बी.ए पदवी घेऊन हे शिक्षण पुर्ण केले.
पदवी शिक्षण घेत घेतच खर्च भागवण्यासाठी महाविद्यालयात `कमवा आणि शिका` योजनेमध्ये काम केलं. त्यातूनही खर्च भागत नसल्याने शिकताना खासगी शिकवण्यांमध्ये शिक्षिकेचा पार्टटाईम जाॅब केला.. पण पदवी घेतलीच.
अमृता बाठे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर जाॅब करतच एमपीएससीचा अभ्यास करायला लागली. त्यात तिची मावशी ज्योती कदम यांच्याकडे राहूनच 2019 मध्ये परीक्षा दिली. त्यात केवळ दोन गुणांनी संधी हुकली.
त्यानंतर २०२० च्या परिक्षेत कोणत्याही परिस्थितीत पास होण्याचा निर्धार केला होता. फेब्रुवारी २०२० मध्ये जाहिरात आली पण मध्येच कोरोनाचं संकट आल्याने परिक्षा ४ वेळा पुढे ढकलली गेली आणि तब्बल 19 महिन्यांनी लांबली व अमृताला पुण्यातून गावाकडे यावे लागले. तेव्हा आजी -आजोबांकडे आजोळी वागजवाडी येथे अभ्यासासाठी राहून परिक्षा दिल्या.
आजोळी वागजवाडी येथे राहूनच मैदानी तयारीही चांगली झाली होती. अनेक अडचणी येत असताना.. परत मराठा आरक्षण समस्येमुळे अमृताचा निकाल ४ महिने लाबंला व ४ जुलैला निकाल लागला आणि अमृताची पोलिस उपनिरीक्षक २०२० (PSI) पदी अखेर निवड झाली. घरच्यांना नव्हे नातेवाईकांसह तर संपूर्ण गावाला आनंद झाला तसेच सगळ्यांनी तिचे सत्कार व कौतुक केलं.