मोठी बातमी! नाशिकमध्ये अजित पवार गटाचा नेता आणि त्याच्या भावाची हत्या, घटनेने उडाली खळबळ..

नाशिक : नाशिक शहरात बुधवारी मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यासह त्यांच्या भावाचा कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उमेश जाधव आणि त्यांचा भाऊ प्रशांत जाधव यांचा कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. पुणे-नाशिक महामार्गावरील आंबेडकरवाडी परिसरात ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, उमेश जाधव आणि प्रशांत जाधव हे दोघे रात्री ११:३० वाजता सार्वजनिक शौचालयाजवळून जात असताना अज्ञात टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी धारदार कोयत्याने दोघांवर वार केले, आणि त्यांना गंभीर जखमी केलं.
डोक्यावर, पाठीवर, पोटावर, हातावर आणि चेहऱ्यावर वार केले गेले. एका भावाचा मनगटही तुटला. अत्यंत अमानुषपणे झालेल्या हल्ल्यात दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. घटनास्थळी काही युवकांनी तातडीने जखमींना शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.
दरम्यान, उमेश जाधव हे अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष होते. त्यांच्या हत्येमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे, आणि परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.