‘तू मला समजून घेतलं नाहीस…’ 20 वर्षांनी मोठ्या वहिनीवरील एकतर्फी प्रेमाचा दुर्दैवी शेवट; सुसाईड नोटने उलगडला धक्कादायक घटनाक्रम


ग्वाल्हेर : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे एकतर्फी प्रेमातून घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. व्यवसायाने फोटोग्राफर असलेल्या 22 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूआधी त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. आपल्या नात्यातील तब्बल 20 वर्षांनी मोठ्या असलेल्या विवाहित वहिनीवर प्रेम जडल्याचा उल्लेख त्याने नोटमध्ये केला असून, तिच्या नकारानंतर आपण मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचल्याचेही लिहिले आहे. पोलिसांनी सुसाईड नोट जप्त करत संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.

मृत तरुणाची ओळख माँटी मोरे (वय 22) अशी झाली असून तो व्यावसायिक फोटोग्राफर होता. शनिवारी तो बराच वेळ खोलीबाहेर न आल्याने त्याची बहीण पल्लवी त्याला पाहण्यासाठी गेली. दरवाजा उघडताच माँटी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. या घटनेनंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्याचवेळी खोलीतून एक हस्तलिखित सुसाईड नोटही मिळाली.

प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, माँटी आपल्या नात्यातील 42 वर्षीय वहिनीवर एकतर्फी प्रेम करत होता. मात्र संबंधित महिलेने त्याचे प्रेम स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर तो सतत तणावाखाली राहत असल्याचे कुटुंबीयांनीही पोलिसांना सांगितले आहे.

सुसाईड नोटमध्ये माँटीने सुरुवातीलाच आई आणि बहिणीची माफी मागितली आहे. “मी तुम्हा सर्वांना सोडून जात आहे. मला माफ करा. मी तिच्यावर मनापासून प्रेम करतो. तिच्याशिवाय जगू शकत नाही. ती माझी झाली नाही, म्हणून मी आयुष्य संपवत आहे,” असे त्याने लिहिले आहे. विशेष म्हणजे, “माझ्या मृत्यूनंतर तिला कोणीही त्रास देऊ नये किंवा दोष देऊ नये,” अशी विनंतीही त्याने केली आहे.

नोटमध्ये संबंधित महिलेचा मोबाईल क्रमांक लिहून त्यासमोर ‘मेरी जान’ आणि ‘आय लव्ह यू’ असे शब्द लिहिलेले आढळले. शेवटच्या काही ओळी मात्र अधिकच भावनिक आहेत. “तुम्हाला मी इतका वाईट वाटत होतो म्हणून मी जात आहे. आई, तू म्हणायचीस ना मरून जा… आज तुझं तेच बोलणं खरं करत आहे,” असे त्याने लिहिले आहे. तसेच, “तू मला कधी समजून घेतले नाहीस. माझ्या मृत्यूस तूच जबाबदार आहेस. मला न्याय मिळावा,” असा उल्लेखही त्याने केला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून सुसाईड नोटची फॉरेन्सिक तपासणी, मोबाईल कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि संबंधित महिलेसह कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा कोणताही प्रकार झाला आहे का, याचाही तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

तपास अधिकाऱ्यांच्या मते, प्राथमिक माहितीनुसार प्रेमाला नकार मिळाल्यानंतर माँटी मानसिक तणावात होता. मात्र सुसाईड नोटमधील आरोपांच्या आधारे कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नसून सर्व पुरावे तपासल्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या घटनेमुळे एकतर्फी प्रेम, भावनिक ताण आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!