एका विषाणूने उध्वस्त केला पोल्ट्री व्यवसाय; चिकन खाणाऱ्यांना सर्वात मोठा झटका, कोंबड्या जमिनीत गाडल्या


मुंबई : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरमध्ये बर्ड फ्लूने अक्षरशः थैमान घातले असून संपूर्ण पोल्ट्री उद्योगाला मोठा हादरा बसला आहे. एका पाठोपाठ एक पोल्ट्री फार्ममध्ये संसर्ग पसरत गेल्याने प्रशासनाला तब्बल ३.८९ लाख कोंबड्या मारून टाकण्याची वेळ आली आहे. एवढेच नाही तर २१ लाखांहून अधिक अंड्यांचीही विल्हेवाट लावण्यात आली असून या कारवाईमुळे शेतकरी आणि पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या महिन्यात नवापूरमधील डायमंड पोल्ट्री फार्ममध्ये ४० हजार कोंबड्यांपैकी ७० कोंबड्या मृतावस्थेत आढळल्यानंतर प्रशासन सतर्क झाले होते. सुरुवातीला स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार सुरू केले, मात्र कोंबड्यांचा मृत्यू थांबत नसल्याने परिस्थिती गंभीर बनली. त्यानंतर परिसरातील आणखी काही पोल्ट्री फार्ममध्येही पक्षी मृतावस्थेत आढळून आले.

एकूण १.७१ लाख कोंबड्या असलेल्या चार पोल्ट्री फार्ममधील १,२८९ कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाल्याने संशय अधिक बळावला. यानंतर रोग अन्वेषण विभाग, पुणे यांच्या माध्यमातून नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय उच्चसुरक्षा पशुरोग संस्थेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले. २९ एप्रिल रोजी आलेल्या अहवालात बर्ड फ्लूची पुष्टी झाली आणि प्रशासनाने तातडीने मोठी कारवाई सुरू केली.

संसर्ग आढळलेल्या परिसरातील एक किलोमीटरच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर कोंबड्या, अंडी आणि पशुखाद्य शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आले. मात्र ४ मे रोजी पुन्हा पाठवलेल्या नमुन्यांमध्ये आणखी चार पोल्ट्री फार्ममध्ये संसर्ग आढळल्याने प्रशासनाची धावपळ वाढली. ८ मेपर्यंतच्या आकडेवारीनुसार १२ पोल्ट्री फार्म बाधित झाले असून लाखो कोंबड्या आणि अंड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे.

दरम्यान, या संकटामुळे पोल्ट्री व्यवसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना मदत मिळावी यासाठी पशुसंवर्धन विभागाने नुकसान भरपाईचा प्रस्ताव तयार केला आहे. विभागाच्या अंदाजानुसार सुमारे ९ कोटी रुपयांची गरज भासणार असून त्यातील ४.५० कोटी रुपयांसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. राज्य सरकारकडेही मदतीची मागणी करण्यात आली आहे.

अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. बाधित फार्ममधील पक्ष्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली असून परिसरातील इतर पोल्ट्री फार्मवर पशुवैद्यकीय विभागाचे बारकाईने लक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!