‘किटलीशिवाय कपबशी भरत नाही, शिट्टी सावध करतेय!’ युगेंद्र पवारांचा भाजपला टोला; सोमेश्वरच्या रणांगणात प्रचाराचा नारळ फुटला

बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचं राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी प्रचाराच्या शुभारंभातच विरोधकांवर मिश्किल शैलीत निशाणा साधला. ‘सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल’च्या प्रचाराचा नारळ श्री सोमेश्वर मंदिरात फोडण्यात आला. यावेळी युगेंद्र पवार यांनी सभासदांना केलेल्या एका आवाहनाची चांगलीच चर्चा रंगली.
विरोधी पॅनलच्या प्रमुखांवर टीका करताना युगेंद्र पवार यांनी पॅनलच्या चिन्हांचा संदर्भ घेतला. “किटली हे आपले चिन्ह आहे आणि किटलीशिवाय कपबशी भरत नाही. दुसरे चिन्ह शिट्टी आहे. शिट्टी आपण सावध करण्यासाठी वाजवतो. त्यामुळे सभासदांना सावध करा, भाजप इथे येत आहे,” असं म्हणत त्यांनी टोलेबाजी केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर सभेत हशा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.

दरम्यान, सोमेश्वर कारखान्याच्या कारभारात आता ज्येष्ठ नेते शरद पवार स्वतः लक्ष घालणार असल्याचं युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हयात असताना शरद पवार कारखान्याच्या कामकाजात हस्तक्षेप करत नव्हते. मात्र, आता अजित पवार नसल्याने कारखाना सभासदांचाच राहिला पाहिजे, यासाठी शरद पवार कारखान्याच्या कामकाजाकडे लक्ष देणार आहेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.


युगेंद्र पवार यांनी प्रचारादरम्यान केलेल्या दौऱ्यांचीही माहिती दिली. आतापर्यंत ८० हून अधिक गावांमध्ये दौरे केल्याचं त्यांनी सांगितलं. या दौऱ्यांमध्ये पवार साहेबांशिवाय पर्याय नसल्याचं अनेक लोक सांगत असल्याचा दावा त्यांनी केला. आपल्या पॅनलमधील उमेदवार सामान्य कुटुंबातून आलेले असून, काही उच्चशिक्षित उमेदवारांनाही संधी देण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं.
विशेष म्हणजे गरडवाडी गावाला पहिल्यांदाच संचालकपदाची संधी देण्यात आल्याचंही युगेंद्र पवार यांनी सांगितलं. तसेच त्यांच्या पॅनलकडून तीन महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर विरोधी पॅनलने दोन महिलांना संधी दिल्याचं त्यांनी सांगितलं. महिलांना राजकारणात आणि संस्थांच्या कारभारात संधी देण्याची भूमिका शरद पवार यांची असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं.
प्रचाराच्या कार्यक्रमात एक मिश्किल प्रसंगही घडला. उमेदवारांची ओळख करून देताना एका कार्यकर्त्याने युगेंद्र पवार यांना उद्देशून “दादा, लव्ह यू” अशी हाक दिली. त्यावर युगेंद्र पवार यांनी, “मी तुम्हाला लव्ह यू टू म्हणालो असतो; पण अलीकडच्या काळात हे जरा जास्त झाले आहे,” अशी मिश्किल टिप्पणी केली. त्यांच्या या उत्तरानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
सोमेश्वर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक आता रंगात येत असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपलं ‘सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल’ मैदानात उतरवलं आहे. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी युगेंद्र पवारांनी केलेली भाजपवरील टोलेबाजी, शरद पवारांच्या भूमिकेबाबत केलेलं वक्तव्य आणि उमेदवारांच्या निवडीचा मुद्दा यामुळे निवडणुकीतील संघर्षाची दिशा स्पष्ट होऊ लागली आहे. त्यामुळे सोमेश्वरच्या निवडणुकीत पुढील काळात कोणते राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगतात, याकडे सभासदांचं लक्ष लागलं आहे.
