पीएफ खात्यात किती पैसे जमा झाले, हे आता एका मेसेजवर कळणार! EPFOची नवी सुविधा; फक्त हा नंबर सेव्ह करा अन् घरबसल्या मिळवा संपूर्ण हिशेब


पुणे : नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएफ खात्यातील जमा रक्कम तपासण्यासाठी आता वारंवार ईपीएफओचे संकेतस्थळ उघडण्याची किंवा उमंग ॲपचा वापर करण्याची गरज भासणार नाही. कारण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पीएफ खात्याची माहिती मिळवण्याची सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे मोबाईलवरून केवळ एक संदेश पाठवून खात्यातील शिल्लक आणि व्यवहारांचा तपशील जाणून घेता येणार आहे.

केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी ईपीएफओच्या स्थापना दिनानिमित्त या सुविधेची घोषणा केली होती. या उपक्रमामुळे नोकरदार वर्गाला पीएफशी संबंधित माहिती मिळवणे अधिक सोयीचे होणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी प्रत्येक वेळी संकेतस्थळावर जाऊन खाते उघडणे किंवा पासवर्ड लक्षात ठेवण्याची कसरत करावी लागणार नाही.

फक्त हा व्हॉट्सॲप नंबर सेव्ह करा!

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये ईपीएफओचा अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक +91 87964 41800 सेव्ह करावा लागेल. त्यानंतर व्हॉट्सॲपवर जाऊन या क्रमांकावर ‘Hi’ असा संदेश पाठवायचा आहे. पुढे चॅटबॉटकडून भाषा निवडण्याचा पर्याय मिळेल. आपल्याला समजणारी भाषा निवडल्यानंतर स्क्रीनवर दिलेल्या सूचनांनुसार पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

यानंतर तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आणि आवश्यक माहिती द्यावी लागेल. तुमच्या यूएएनशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर एकवेळचा संकेतांक (OTP) पाठवला जाईल. हा संकेतांक टाकून ओळख पडताळणी पूर्ण केल्यानंतर पीएफ खात्याची माहिती मिळवता येईल.

एका मेसेजवर काय-काय माहिती मिळणार?

या सुविधेच्या माध्यमातून खातेधारकांना त्यांच्या पीएफ खात्यातील ताजी शिल्लक तपासता येणार आहे. तसेच मागील पाच व्यवहारांचा तपशील पाहता येईल. कंपनीकडून दरमहा कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात पैसे जमा केले जात आहेत की नाही, याची माहिती घेणेही सोपे होणार आहे. याशिवाय पीएफ पासबुक पाहण्याची आणि उपलब्ध पर्यायानुसार ते डाउनलोड करण्याची सुविधाही मिळणार आहे.

ओटीपी शेअर केल्यास अडचणीत याल!

व्हॉट्सॲपवरून पीएफची माहिती घेताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम संबंधित क्रमांक अधिकृत असल्याची खात्री करा. पीएफ खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक वापरा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला ओटीपी, पासवर्ड किंवा खात्याशी संबंधित गोपनीय माहिती देऊ नका.

महत्त्वाचे म्हणजे, या सुविधेचा उपयोग पीएफ खात्यातील माहिती मिळवण्यासाठी आणि पासबुक पाहण्यासाठी आहे. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून थेट पीएफचे पैसे काढता येत नाहीत. त्यामुळे पीएफ खात्यातील जमा रक्कम आणि कंपनीकडून होणारे योगदान तपासू इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही सुविधा महत्त्वाची ठरू शकते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!